- खलील गिरकरमुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाचा दिवस जवळ येऊ लागताच निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. या मतदारांमध्ये युवावर्गाचा भरणा मोठ्या प्रमाणात असल्याने आॅनलाईन पध्दतीच्या प्रचाराला महत्त्व आले आहे. आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पध्दतीच्या प्रचारातून मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न प्रमुख उमेदवारांकडून केला जात आहे. मतदारांची पहिल्या पसंतीची मते मिळवण्यासाठी सर्व उमेदवार आटापिटा करू लागले आहेत.कोकण पदवीधर मतदारसंघात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश असल्याने गोव्याच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची लगबग चालली आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी उमेदवारांनी आॅनलाईन प्रचारावर भर दिला आहे. तसेच पारंपारिक पध्दतीचा प्रचार देखील सुरू आहे.फेसबुक पेज, टष्ट्वीटर अकाऊंट, व्हॉटसअप ग्रुप या माध्यमातून प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 25 जूनला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेतर्फे ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.निरंजन डावखरे यांच्या प्रचाराची जबाबदारी भाजपने राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर दिली असून त्यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर व इतर नेत्यांची फळी प्रचारामध्ये कार्यरत आहे. नजीब मुल्ला यांच्या प्रचाराची सुत्रे माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असून सुनील तटकरे यांनी देखील जबाबदारी स्वीकारली आहे. मुल्ला यांना मतदान करण्यासाठी आव्हाड व संघर्ष महिला संस्थेच्या अध्यक्षा ऋता आव्हाड मतदारांना दूरध्वनी करून आवाहन करत आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणूकीत वैयक्तिक लक्ष घातले आहे. संजय मोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची पूर्ण फळी त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेश असला तरी प्रमुख तिन्ही उमेदवार ठाणे शहरातील आहेत. त्यामुळे प्रचाराचा सर्वात जास्त धुरळा ठाण्यात उडालेला दिसून येत आहे.
कोकण पदवीधर प्रचार; समाजमाध्यमांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:03 AM