लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह कोकणात सक्रिय झालेल्या मान्सूनचा मारा कायम आहे. १६ जुलै रोजीदेखील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरला मात्र यलो अलर्ट आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबईतदेखील रिमझिम पाऊस सुरूच आहे. येथील पावसाची सरासरी २५ मि.मी. असून, ११ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. २४ झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
१६ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईतदेखील पावसाच्या रिमझिम सरी पडतील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.