निवडणूक प्रचारातून कोकणचे प्रश्नच हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:47 AM2019-10-15T05:47:39+5:302019-10-15T05:47:52+5:30

कोकणातील अनेक अभ्यासकांनी मुंबईत कार्यरत असलेल्या कोकण मंडळांचा उल्लेख केला व ही मंडळेच कोकणातील राजकारण स्थानिक पातळीवर रुजून यावे, बहरावे यासाठी अडथळा आणत असल्याचा आरोप केला.

Konkan queries from election campaign! | निवडणूक प्रचारातून कोकणचे प्रश्नच हद्दपार!

निवडणूक प्रचारातून कोकणचे प्रश्नच हद्दपार!

Next

राजू नायक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणच्या ज्वलंत प्रश्नांचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गांभीर्याने समावेश करावा, असे एकाही पक्षाला वाटलेले नाही. कोकणावर जगणाऱ्या शिवसेनेने तर कोकणच्या समस्यांना अनुल्लेखाने मारले आहे. तडफदार नेतृत्वाचा अभाव, राजकारणाचे केंद्रीकरण आणि मवाळ मतदार हे या भागाचे खरे दुखणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताजे झाले आहे.


‘‘कोकणातला ग्रामीण समाज अर्धशिक्षित आहे, त्यांच्यात राजकीय जागृती नाही. रोजगार, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांचे राजकारण करायचे भान त्याला अजून आलेले नाही, त्याचाच गैरफायदा राजकीय पक्ष घेत आले आहेत,’’ असे मत पत्रकार, उद्योजक आणि बागायतदार यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले. ‘‘अब्दुल रहमान अंतुले आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन नेते भाई सावंत, तसेच बाळासाहेब सावंत सोडले तर कोकणाला व्हिजन असलेले नेतृत्व लाभले नाही,’’ असे मत पत्रकार सतीश कामत यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या मते, नवीन तडफदार असे स्थानिक नेतृत्व तयार व्हायला शिवसेनेचीच खरी अडचण आहे. मातोश्रीवरून राजकारण चालवायची पद्धत असल्याने कोकणात कोणाला पुढे येऊच दिले नाही. ‘‘मुंबईतील, कोकणातील मंडळांना पकडून त्यांनी कोकणाला अंकित बनविले आहे ज्यांना प्राथमिक शाळा किंवा देवळे बांधण्यातच स्वारस्य आहे.’’


कोकणातील अनेक अभ्यासकांनी मुंबईत कार्यरत असलेल्या कोकण मंडळांचा उल्लेख केला व ही मंडळेच कोकणातील राजकारण स्थानिक पातळीवर रुजून यावे, बहरावे यासाठी अडथळा आणत असल्याचा आरोप केला. कोकणातून मुंबईत गेलेला माणूस असुरक्षित असतो. त्यामुळे तो शिवसेनेसारख्या संघटनांना पकडून राहतो, या प्रभावाचा वापर करून तो गावातील लोकांची मंत्रालयातील कामे करतो. मुंबईत कोणी आजारपणासाठी आला असेल तर इस्पितळातील ओळख व तेथे वास्तव्यासाठीही मदत करतो. त्या भांडवलावर ही मंडळी कोकणाची तारणहार बनतात व मुंबईहून आदेश आल्यानुसार गाव मतदान करतो. त्या बळावर कोकणातील उमेदवारही मुंबईहून लादले जातात. ‘‘गावात देवळे बांधायची किंवा जुन्यांचा जीर्णोद्धार करायचा आणि तेथे नारळ ठेवून गावकऱ्यांना शपथपूर्वक मतदान करायला भाग पाडायचे हा प्रकार कोकणात अनेक वर्षे चालतो आणि २१व्या शतकातही त्यात फरक नाही. या भोळ्या जनतेचा वापर नेते आणि पक्ष सतत करीत आले आहेत. त्यामुळे कोकणात ना रस्ते चांगले लाभले, ना उच्च शिक्षणाची, तंत्रशिक्षणाची सोय आहे, ना अरोग्य सेवा दिल्या गेल्या. लोकांना मुंबईवर अवलंबून ठेवून त्यांचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या पार चिंधड्या उडविल्या गेल्या आहेत,’’ असे एक उद्योजक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २० वर्षांत एकही सक्षम उद्योग आला नाही. आले त्यांना मुंबईत बसून नेत्यांनी खो घातला व आता नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प येऊ घातला तर त्याला मुंबईच सुरुंग लावते आहे. स्थानिकांशी ना संवाद ना त्यांच्या हिताचा निर्णय. शिवसेनाही नाणार प्रश्नावर धरसोड भूमिका अवलंबिते आहे. याचाच स्थानिक बुद्धिवाद्यांमध्ये राग आहे.

स्थानिक पत्रकार म्हणाले, कोकण हा भाग उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळा आणि त्याची वैशिष्ट्येही वेगळी आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण प्रांतासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने जाहीरनाम्यात वेगळी तरतूद करायला हवी होती. शिवसेनेने तर कोकणासाठी वेगळा जाहीरनामा द्यायला हवा होता. त्यांनी तसे केलेले नाही याचा अर्थ शिवसेनेने कोकणाला गृहीत धरलेले आहे.

Web Title: Konkan queries from election campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.