Konkan Railway: कोकण रेल्वेला मिळणार ‘एचएचटी’ यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:54 AM2023-04-18T09:54:26+5:302023-04-18T09:54:39+5:30
Konkan Railway: मागील २५ वर्षांत कोकण रेल्वेच्या बहुतांशी सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. ऑनलाइन प्रणालीचा सक्षमपणे अवलंब करतानाच विविध मार्गांवर धावणाऱ्या आपल्या सर्व गाड्यांतील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी अर्थात हॅण्ड हेल्ड टर्मिनल हे आधुनिक यंत्र देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
नवी मुंबई : मागील २५ वर्षांत कोकण रेल्वेच्या बहुतांशी सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. ऑनलाइन प्रणालीचा सक्षमपणे अवलंब करतानाच विविध मार्गांवर धावणाऱ्या आपल्या सर्व गाड्यांतील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी अर्थात हॅण्ड हेल्ड टर्मिनल हे आधुनिक यंत्र देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या पर्यवेक्षकांचे काम अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
कोकण रेल्वेच्या मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, एर्नाकुलम या एक्स्प्रेस गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांकडून यापूर्वी एचएचटी यंत्राचा वापर केला जात आहे. त्याच धरतीवर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उर्वरित सर्व गाड्यांमधील पर्यवेक्षकांनाही एचएचटी मशिन देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. या प्रणालीमुळे आरक्षण स्थिती तपासण्यासह पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी तसेच तिकीट तपासण्यासह सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्यांची गरज भासणार नाही. या मशिन रेल्वेच्या सर्व्हरशी जोडले जाणार असल्यामुळे सीटसंदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना सीट रिकामी असल्यास ती मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सीट वाटपात पारदर्शकताही निर्माण होईल, असा विश्वास कोकण रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे.