मुंबई :
गणेशोत्सवासाठी कोकणी माणूस गावाकडे निघाला आहे. मात्र, कोकण रेल्वेने गाव गाठणाऱ्या प्रवाशांना रत्नागिरीमधील विलवडे स्थानकात गाडी प्लॅटफॉर्मवर लागत नसल्याने उतरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचे हाल होत आहेत.
कोकण रेल्वेच्या एका मुंबईकर प्रवाशाने याबाबत सांगितले की, कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील विलवडे स्थानक येथे १८ ऑगस्ट रोजी आम्ही सीएसएमटी सावंतवाडी स्पेशल रेल्वेने सकाळी १०.५० ला पोहोचलो. तेव्हा गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर लावण्यात आली. येथे उतरण्यासाठी प्लॅटफॉर्मची सुविधा नव्हती. अंदाजे ३० ते ३५ प्रवासी येथे उतरले. यात लहान मुले, वयोवृद्ध महिला तसेच पुरुषांचा समावेश होता. रेल्वेच्या जिन्याने पाच ते सहा फूट खाली उतरणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. लोकांना गाडीच्या डाव्या बाजूला उतरावे की उजव्या बाजूला हेही कळत नव्हते. .
कोकण रेल्वेच्या या वागणुकीबाबत प्रवाशांमधील एका व्यक्तीने रेल्वे स्थानकात तक्रार दिली. त्याची पावतीही घेतली. दुसरीकडे २० ऑगस्ट रोजी परतीच्या प्रवासासाठी निघालो, तेव्हाही हाच प्रकार घडला. दिवा-सावंतवाडी-मडगाव या रेल्वेमधील प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ येथे त्याच पद्धतीने उतरवण्यात आले. कोणतीही प्लॅटफॉर्मची सुविधा नसताना वयोवृद्ध आणि ५ ते ६ महिन्यांचे बाळ उतरत होते.