Konkan Railway: होळीसाठी कोकण रेल्वेची साप्ताहिक गाडी, या स्थानकांवर थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:59 AM2023-01-29T11:59:01+5:302023-01-29T12:01:05+5:30
Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वेने यंदाही विशेष गाड्या साेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनल ते सुरथकल या मार्गावर ३ फेब्रुवारीपासून प्रत्येक शुक्रवारी विशेष साप्ताहिक गाडी सोडण्यात येणार आहे.
नवी मुंबई : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वेने यंदाही विशेष गाड्या साेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनल ते सुरथकल या मार्गावर ३ फेब्रुवारीपासून प्रत्येक शुक्रवारी विशेष साप्ताहिक गाडी सोडण्यात येणार आहे. ही विशेष साप्ताहिक गाडी ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन ३ फेब्रवारीपासून लोकमान्य टिळक टर्मिनल ते सुरथकल (गाडी क्रमांक ०१४५३) दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी लोकमान्य टिळक स्थानकातून रात्री ८.१५ मिनिटांनी सुटेल. तर ती दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता सुरथकल स्थानकावर पोहचेल.
सुरथकल स्थानकावरून ४ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी विशेष साप्ताहिक गाडी ( क्रमांक ०११४५४) सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी लोकमान्य टिळक स्थानकावर पोहचेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेलहून मडगावसाठी आज विशेष गाडी
नवी मुंबई : पनवेलहून मडगावला जाण्यासाठी कोकण रेल्वेने उद्या विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१४२९ ही विशेष गाडी रविवारी रात्री ९:१५ वाजता पनवेल स्थानकावरून सुटणार आहे.
तर गाडी क्रमांक ०१४३० ही मडगाव जंक्शनहून सकाळी ८:३० वाजता पनवेलला जाण्यासाठी सुटेल. ही गाडी त्याचदिवशी रात्री ८:१० मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबेल. दरम्यान, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.