लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोकण रेल्वेवर रोहा ते वीर या मार्गाचे दुहेरीकरण होऊन आता तीन वर्षे झाली. परंतु, पुढील ३५० किमी लांबीचे दुहेरीकरण लांबले आहे. त्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाला रेल्वे मंडळाच्या होकाराची प्रतीक्षा आहे. यासंदर्भातील प्रस्ताव वर्षभरापूर्वीच रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.
कोकण रेल्वे रोहा ते ठोकूर अशी ७४० किमी लांबीची आहे. रोहा ते वीर ४६.८ किमीचा या मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर या कामाबाबत हालचाल झाली नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. हे काम पूर्ण होत नसल्याने कोकणात जाताना चाकरमान्यांचे हाल होतात. यावर उपाय म्हणून टप्पा दुहेरीकरण करण्यावर भर दिला जात आहे. रेल्वेचे सपाट अशा जमिनीवर प्रतिकिमी दुहेरीकरण करण्यासाठी २० कोटी खर्च अपेक्षित आहे. शिवाय घाट, बोगदा या ठिकाणी प्रतिकिमी १०० कोटी खर्च येतो. रोहा ते वीर असे दुहेरीकरण करताना ५३० कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकूर व कणकवली ते सावंतवाडी असे टप्पा दुहेरीकरण करण्यात येईल.
- कोकणात जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावतात. ब्लॉक काळात तर रेल्वेगाड्या खूप विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेगाड्या वेळेवर चालाव्यात याकरिता काम केले जात आहे, असेही संतोष कुमार झा यांनी सांगितले.