Join us

कोकण रेल्वेची यंदा ‘नफा एक्स्प्रेस’ सुस्साट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2015 9:47 PM

बाळासाहेब निकम : गतवर्षीपेक्षा तिप्पट नफा

रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला २०१४-१५ या आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल तिप्पट निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षी कोकण रेल्वेला १३.११ कोटी निव्वळ नफा झाला होता. यंदा हाच नफा ३९.३९ कोटी एवढा असून, गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रत्नागिरी विभागातील सौंदळ व वेरवली या नवीन रेल्वे स्थानकांचे भूमिपूजन झाले असून, लवकरच या स्थानकांचे काम सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकारपरिषदेत दिली. २०१४-१५ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेचे वाहतूक व इतर मार्ग यापासूनचे उत्पन्नही गतवर्षीच्या ९३२.९५ कोटींवरून ९७२.६१ कोटींवर पोहोचले आहे. एकूण प्रकल्प उत्पन्नातही गतवर्षीच्या ३४४.३७ कोटींवरून ३५० कोटीपर्यंत वाढ झाली आहे. कोकण रेल्वेने या आर्थिक वर्षात निवृत्तिवेतन निधी म्हणून ४१.३७ कोटींची तरतूद केली आहे. गतवर्षी हीच तरतूद २३.३७ कोटी होती. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यातच कोकण रेल्वेने गतवर्षीच्या याच चार महिन्यातील उत्पन्नापेक्षा २४ टक्के अधिक उत्पन्न मिळवून उच्चांक निर्माण केला आहे. गतवर्षी या चार महिन्यात हेच उत्पन्न २५९.९५ कोटी होते. या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यात हे उत्पन्न ३२१.३५ कोटी झाले आहे. कोकण रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा देण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात करण्यात आला आहे. रत्नागिरी स्थानकावर एस्केलेटर सुरू करण्यात आला असून, लवकरच येथे ट्रव्हलेटर सुरू केला जाणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, कणकवली येथे एटीएम लवकरच सुरू केली जाणार आहेत. मालवणमध्ये जुलै महिन्यातच टाऊन बुकिंग एजन्सी सुरू करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेने उन्हाळी वेळापत्रक अमलात आणले आहे. (प्रतिनिधी)दुपदरीकरणास रविवारी सुरुवातकोकण रेल्वेच्या दुपदरीकरण कामाला येत्या ८ नोव्हेंंबरला रोहा येथे सुरूवात होणार आहे. पहिल्या दिडशे किलामीटर्सच्या दुपदरीकरणासाठी अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे. दुसरा टप्पा सिंधुदुर्ग स्थानक ते सावंतवाडी असा होणार आहे. बोगद्यांमधील दुपदरीकरण कामही त्यानंतर वेग घेणार आहे. संपूर्ण दुपदरीकरण कामासाठी साडेदहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रुळ बदलण्याचे काम कोकण रेल्वेमार्गावर गेल्या चार वर्षात झालेल्या अनेक अपघातांमुळे रूळ खराब झाल्याची तक्रार प्रवाशांतून केली जात होती. रेल्वेच्या अभ्यासानुसार ५ जीएमटी एवढी वाहतूक झाल्यानंतरच रूळ नवीन टाकले जातात. मात्र, कोकण रेल्वेमार्गावरील लोखंडी रूळांवरून आतापर्र्यंत २०० जीएमटी वाहतूक झाली आहे. परंतु येथील खाऱ्या हवामानामुळे लोखंडी रूळ खराब होतात हे मान्य करून रोहा ते करंजाडीपर्यंत ११७ किलोमीटर लांबीचे नवीन रूळ टाकण्यात आले आहेत. ४२ किलोमीटर्स लांबीचे रूळ अजून उपलब्ध झाले असून, ते आवश्यकतेनुसार बदलले जाणार आहेत. चोऱ्यांना आळा घालणारकोकण रेल्वेमध्ये गेल्या काही काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेतून पडून जखमी वा मृत होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याबाबत विचारता रोहा ते वीर दरम्यान चोऱ्यांचे प्रमाण दिसून येत आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांची मदत रेल्वे घेत आहे. रेल्वेतून पडून होणारे मृत्यू टळण्यासाठी बोगीच्या पायऱ्यांवर बसून प्रवास करू नये, असे आवाहन निकम यांनी केले. विशेष फेऱ्यांमध्ये वाढकोकण रेल्वेने उन्हाळी हंगामात १८० विशेष रेल्वेफेऱ्या सोडल्या. गेल्या वर्षी याच काळात १३९ विशेष फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षी गणपती उत्सव काळात २०७ विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या, त्या यावेळी २५० पर्यंत वाढविण्यात आल्या होत्या. रो-रो सेवेला १६ वर्षे पूर्णकोकण रेल्वे मार्गावरून २६ जानेवारी १९९९ला सुरू झालेल्या रो-रो मालवाहतूक सेवेला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही सेवा कोेलाड ते वेर्ना आणि अंकोल व सुरतकल अशी सुरू आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात रो-रो सेवेतून ७३.३० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षी हेच उत्पन्न ६५.७२ कोटी होते. कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेला गेल्या काही वर्षात प्रतिसाद वाढला आहे.