'कोकणकन्या', मांडवी एक्स्प्रेस आता २४ ऐवजी २२ डब्यांची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:37 IST2019-05-03T14:36:32+5:302019-05-03T14:37:32+5:30
कोकणवासीयांमध्ये लोकप्रिय असलेली कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस नव्या रुपात येणार आहे.

'कोकणकन्या', मांडवी एक्स्प्रेस आता २४ ऐवजी २२ डब्यांची!
मुंबई : कोकणवासीयांमध्ये लोकप्रिय असलेली कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस नव्या रुपात येणार आहे. या मेल, एक्स्प्रेसला इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फमन बुश (एलएचबी) लावण्यात येणार आहेत. त्यामुळे डब्यातील आसन क्षमता वाढली जाणार असल्याने दोन डबे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही मेल, एक्स्प्रेस २४ डब्यांऐवजी २२ डब्यांची असेल, अशी माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली.
सध्या धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला आयसीएफचे डबे जोडण्यात आले आहेत. यामुळे डब्यांची लांबी-रूंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय यामध्ये आधुनिकता येईल. या गाडीची संरचना प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ४ डबे, स्लीपरचे डबे ११, सामान्य डबे ४, पँट्री कारचा एक डबा, एसएलआरचे २ असे २४ डबे आहेत.
१० जूनपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला एलएचबी कोच लावण्यात येईल. यावेळी गाडीची संरचना प्रथम आणि द्वितीय श्रेणी एक एसी डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ४ एसी डबे, ११ स्लीपर क्लास, २ सामान्य डबे आणि एक पँट्री डबा आणि जनरेटर कार आणि एसएलआरचे दोन डबे अशी असेल. २२ डब्यांची ही गाडी असेल. नव्या रचनेमुळे कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये १२४ प्रवासी क्षमता आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थची रूंदी वाढण्याने ज्येष्ठांना झोपण्यास जादा जागा मिळणार आहे.
...म्हणून घेतला निर्णय
कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले की, इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) पेक्षा लिके होल्फमन बुश (एलएचबी)च्या डब्यांची लांबी जास्त असल्याने ही नवीन प्रकारातील गाडी २२ डब्यांची आहे. आयसीएफच्या एका डब्यात ७२ सीट असतात, तर एलएचबी डब्यात ८० सीट आहेत. त्यामुळे दोन डबे कमी केले आहेत.