Join us

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे रूपडे पालटणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:51 AM

कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे आता पालटणार आहे.

- कुलदीप घायवट मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे आता पालटणार आहे. सध्याच्या गाड्यांची जागा नव्या एलएचबी (लिके होल्फमन बुश) गाड्या घेणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुखकर आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.नव्या गाड्यांचा रंग निळ्याऐवजी लाल-करडा असेल. डब्यांची वाढलेली लांबी आणि रुंदी, मोठे प्रवेशद्वार, आधुनिक बेसिन आणि शौचालये अशा सुविधा त्यात अंतर्भूत असतील. कपुरथळा (पंजाब) येथील रेल कोच फॅक्टरीत लिके होल्फमन बुश हे आधुनिक डबे बनविण्यात येत आहेत. भविष्यात संपूर्ण देशात एलएचबी प्रकारातील डबे वापरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डब्यांची लांबी आणि रुंदी वाढल्याने प्रवाशांना गाडीतून फिरण्यास जास्त जागा मिळणार आहे, शिवाय बेसिन, टॉयलेटच्या रचनेतही सुधारणा करण्यात आली आहे, तसेच दरवाजातील जुनी चिंचोळी जागा वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे चढता-उतरताना प्रवाशांना धक्काबुकी, गर्दीला सामोरे जावे लागणार नाही.>प्रवासी क्षमता वाढणारनव्या गाडीच्या शयनयान (स्लीपर कोच) डब्यात ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतात, शिवाय एसी ३ टायर (बी १ ते बी ५)मध्ये ६४ ऐवजी ७२ प्रवासी, एसी २ टायरमध्ये ५४ आणि एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता आहे. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये एकूण १२४ प्रवासी क्षमता आणि मांडवी एक्स्प्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थची रुंदी वाढण्याने ज्येष्ठ नागरिकांना झोपण्यास जादा जागा मिळणार आहे.>वेग वाढणारएलएचबी कोचची बांधणी बाहेरून स्टील आणि आतून अ‍ॅल्युमिनिअम धातूने करण्यात आली आहे. त्यामुळे गाडीचे वजन कमी झाल्याने गाडीचा वेग १०० किमीवरून १३० किमीवर पोहोचला आहे. शिवाय एलएचबी डबे अँटी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून, त्यांचे वजन साधारण ३९.५ टन इतके आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :रेल्वे