Join us

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली - विजया रहाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 12:29 PM

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. या निकालाने कायद्याचे राज्य स्थापित होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.

मुंबई - अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिन्ही  आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटले आहे.

निकाल समजल्यानंतर रहाटकर म्हणाल्या कि, या निर्णयाने त्या भगिनीला न्याय मिळाला आहे. तिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे. गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे. या निर्णयाने कायद्याचे भय निर्माण झाल्याने यापुढे कुणीही असा अत्याचार करण्यास धजावणार नाही.

कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला, तिच्या कुटुंबीयांना जलद न्याय मिळवून दिला आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहील यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल, अशी खात्री ही त्यांनी व्यक्त केली.

आरोपींना फाशीची शिक्षाकोपर्डी बलात्कार व हत्या खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय 25 वर्ष ) याला अत्याचार व हत्येच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयाने बुधवारी (29 नोव्हेंबर) फाशीची शिक्षा सुनावली. तर संतोष गोरख भवाळ (वय 30 वर्ष) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26 वर्ष) यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची जिल्हा न्यायालयाच्या आवारात तुडूंब गर्दी जमली आहे.

''माझ्या छकुलीला मिळाला न्याय''

कोर्टाने तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा सुनावल्यावर पीडित मुलीच्या आईला कोर्टात अश्रू अनावर झाले. माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर दिली. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावरही विश्वास होता. पोलीस विभागाने तपासातून छकुलीला न्याय मिळवून दिला आहे, असंही त्यांनी पुढे म्हंटलं. मी शेवटपर्यंत लढणार, कोणत्याही छकुलीसाठी असाच लढा देणार, असंही यावेळी त्यांनी म्हटले.

घटनेनंतर 1 वर्षे चार महिन्यांत निकाल नगर येथील  स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करुन घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी लढविला़ जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अ‍ॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला.

न्यायव्यवस्थेचे आभार – शिक्षणमंत्री विनोद तावडेकोपर्डीच्या दुर्दैवी  घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. हे दुष्कृत्य करणा-या नराधमांना फाशी झाली पाहिजे, अशी भावना महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेकडून व्यक्त होत होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कायदेशीरपणे न्यायालयात बाजू मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा दुर्दैवी घटनांची गय केली जाणार नाही असा संदेश दिला. फास्ट ट्रॅक न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन दोषींना फाशीची शिक्षा झाली. त्या निकालामुळे अशा प्रवृत्तीकडून लोक परावृत्त होतील असा संदेश आता समाजात पोहोचू शकेल. या खटल्याचा निकाल जलदगतीने दिल्याबद्दल महाराष्ट्राची कोटयवधी जनता न्यायव्यवस्थेचे आभार मानत आहे. या निकालामुळे दोषींना न्याय वेळेत मिळेल असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :कोपर्डी खटलामुंबईअहमदनगरबलात्कारखूनगुन्हा