कोप्रोलीत ४ बळी!
By admin | Published: July 16, 2014 12:41 AM2014-07-16T00:41:19+5:302014-07-16T00:41:19+5:30
उरणच्या कोप्रोली गावात साथीच्या आजाराने दोन दिवसांत तब्बल चार बळी घेतले आहेत. एवढी गंभीर बाब असूनही आरोग्यविभागाने पाचपैकी इतर चौघांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणे दिली आहेत
चिरनेर : उरणच्या कोप्रोली गावात साथीच्या आजाराने दोन दिवसांत तब्बल चार बळी घेतले आहेत. एवढी गंभीर बाब असूनही आरोग्यविभागाने पाचपैकी इतर चौघांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणे दिली आहेत. तालुकाभरातील सोनारी गावात ६ आणि काही दिवसांपूर्वी कोप्रोली गावात १ असे सातच रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह मिळाले असून त्यापैकी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे तालुक्याचे आरोग्य अधिकारी सचिन संकपाळ यांनी लोकमतला सांगितले. करंजा, कोप्रोली आणि सोनारी या गावातील नागरिक पाणी साचवून ठेवत असल्याने याच गावांना डेंग्यूचा धोका असल्याचा अहवालही दिला.
गावात असलेल्या डेंग्यूसारख्या साथीच्या आजारामुळे हे मृत्यू डेंग्यूमुळेच तर झाले नाहीत ना, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आज दिवसभरात उरण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने संपूर्ण कोप्रोली गावाची पाहणी करुन सोमवारी ओढवलेले चौघांचे मृत्यू हे डेंग्यूमुळे नसल्याचे स्पष्ट केले आहे. या चौघांपैकी एकाचा हृदय विकाराने तर एकाचा मधुमेह असल्याने तर दोन रुग्ण महिन्यांपासून आजारी होते.
कोप्रोली गावाबरोबरच पाणदिवे आणि खोपटे गावाचेही सर्व्हेक्षण केले असून या दोन्ही गावांमध्ये एकही डेंग्यूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्यविभागाचे म्हणणे आहे. कोप्रोलीत मात्र यापूर्वी एक डेंग्यूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता, तर सोनारीत मे महिन्यात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते, अशी माहितीही सचिन संकपाळ यांनी दिली. दरम्यान, काल एकाच दिवशी चार रुग्ण दगावल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पुंडलिक साळुंके यांनीही कोप्रोली गाठून पहाणी केली. (वार्ताहर)