स्वच्छता मोहिमेत कोरियातील विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:11 AM2020-01-13T01:11:25+5:302020-01-13T01:11:30+5:30
मुंबई : स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचा संकल्प केल्यानंतर आपल्या विभागातून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला असून आपण ज्या ठिकाणी व्यवसाय ...
मुंबई : स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचा संकल्प केल्यानंतर आपल्या विभागातून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला असून आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो, राहतो ती जागा, तो परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतल्यास मुंबई स्वच्छ होण्यास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
दक्षिण कोरियातील असेझ ही संस्था संपूर्ण जगभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवित आहे. या संस्थेच्या दक्षिण कोरियातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत क्राइम फ्री स्ट्रीट या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जी/दक्षिण विभागातील महालक्ष्मी धोबीघाट येथे रविवारी सकाळी राबविण्यात आली. यावेळी महापौरांनी या मोहिमेत सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. जी/दक्षिण विभागात आयोजित मोहिमेत मुंबई विद्यापीठांतर्गत येत असलेल्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार, नालासोपारा आदी ठिकाणच्या दोनशे ते अडीचशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.