मुंबई : कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सुरुवातीला उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. ज्या वेळी घटना घडली, तेव्हा तिथे आपण नव्हतो, असे एकबोटे यांनी याचिकेत म्हटले आहे.न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर, एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांनी ही याचिका न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सादर केली. या खंडपीठाने एकबोटे यांच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या लोकांवर सणसवाडी येथे दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या जमावाला मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्याविरोधात पिंपरी व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. अटक होईल, या भीतीने एकबोटे यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु एकबोटे यांच्यावर नोंदविलेले गुन्हे गंभीर आहेत, असे निरीक्षण नोंदवत, पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे एकबोटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कोरेगाव भीमा हिंसा प्रकरण : एकबोटेंच्या जामिनावर उद्या होणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:50 AM