मुंबई - माओवादी थिंक टँक अटक प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारसहीत पोलिसांवर टीकास्त्र सोडले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून भाजपाची सरकारे उलथवून टाकण्याचा कट रचल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी समोर आणली आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ''माओवादी भाजपप्रणीत सरकारे उलथवतील म्हणून त्यांना अटक केली, असे सांगणे सरकारने थांबवावे. हे विधान मूर्खपणाचे आहे. तुमची सरकारे कोण उलथवणार ? मनमोहन सिंग यांचेही सरकार माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी नाही, तर जनतेनेच उलथवले होते. सरकारे आज तरी लोकशाही मार्गानेच उलथवली जातात'',अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - - देशातील तसेच राज्याराज्यांतील भाजपप्रणीत सरकारे उलथवून टाकण्याचा या मंडळींचा कट होता, असे पोलिसांतर्फे वारंवार सांगितले जात आहे.
- भीमा-कोरेगावप्रकरणी दंगली घडवून महाराष्ट्र पेटविण्यामागे हेच माओवादी उद्योगपती होते व आग विझल्यावर आता त्यांना अटका झाल्या आहेत.
- आपल्या देशात राजकारणी आणि विचारवंतांची एक फळी या उद्योगी मंडळींच्या समर्थनासाठी उभी राहते. राहुल गांधींपासून शरद पवारांपर्यंत, प्रकाश आंबेडकरांपासून अखिलेश यादवपर्यंत प्रत्येक जण पकडलेल्या माओवाद्यांच्या समर्थनासाठी छाती पिटत आहे.
- खरे-खोटे श्रीराम जाणे, पण पंतप्रधान मोदी यांना राजीव गांधींप्रमाणे उडवायचा कट या मंडळींनी रचला होता अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तरीही या मंडळींचे समर्थन कसे काय होऊ शकते? दुसर्या बाजूला काही हिंदुत्ववादी पोरे पकडली व त्यांच्यावर पानसरे, दाभोलकर, गौरी लंकेश वगैरेंच्या खुनाचा आरोप ठेवल्याने हेच माओप्रेमी वेगळी नौटंकी करतात. हिंदुत्ववाद्यांचा बीमोड केला पाहिजे, असे सांगतात.
- ‘हिंदुत्ववादी’ पोरे दहशतवादी व ‘माओवादी’ म्हणजे विचारवंत, विद्रोही कवी! अशी दुटप्पी मांडणी करणे हाच खरे तर देशद्रोह आहे.
- चिदंबरम यांना शहरी नक्षलवाद अमान्य आहे, पण याच महाशयांनी ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना आणली व हिंदूना बदनाम केले.
- कथित माओवाद्यांना अटक करू नये, त्यांना नजरकैदेत ठेवावे असे निर्देश महात्मा सुप्रीम कोर्टाने दिले, पण हिंदू पोरांसाठी कुणी धर्मात्मा बनायला तयार नाही. सध्याच्या कारवायांत पाणी मुरते आहे अशी शंका सगळ्यांनाच आहे.
- माओवादी भाजपप्रणीत सरकारे उलथवतील म्हणून त्यांना अटक केली असे सांगणे सरकारने थांबवावे. हे विधान मूर्खपणाचे आहे. तुमची सरकारे कोण उलथवणार? मनमोहन सिंग यांचेही सरकार माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी नाही, तर जनतेनेच उलथवले होते.
- इंदिरा गांधी व राजीव गांधींमध्ये एक बेडरपणा किंवा साहस होते. त्या साहसाने त्यांचा घात केला. मोदी तसे साहस करणार नाहीत.
- पोलिसांनी जिभेवर लगाम ठेवून कामे करावीत, नाहीतर मोदी व त्यांच्या भाजपचे नव्याने हसे होईल.