मुंबई : हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसारच, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरु केला. पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरु झालेल्या पावसाने दुपारपर्यंत जोर कायम ठेवल्याने कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना धडकी भरलीच. मुंबईतल्या सखल भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रामुख्याने माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. तर उर्वरित ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी पावसाचा वेग आणि मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग नेहमीच्या तुलनेत कमी झाला होता.
कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. मुंबईकर कामासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र त्यातही अडचणी वाढतच आहेत. जुन महिना ब-यापैकी कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. विशेषत: शुक्रवारसह शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. विशेषत: सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस दुपारचे १२ वाजले तरी धो धो कोसळतच होता. या वेळेत पावसाने शहरासह उपनगरात आपला जोर कायम ठेवल्याने शुक्रवारी सकाळी साडेवाजेपर्यंत मुंबईत ५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ ते ९ या वेळेत दक्षिण मुंबईत कुलाबा, नरिमन पॉइंट येथे २५ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ९ ते १० या वेळेत मलबार हिल, मेमनवाडा, वरळी, दादर, भायखळा, हाजी अली, मुंबई सेंट्रल, धारावी, माटुंगा, कुर्ला, विलेपार्ले या बहुतांश ठिकाणी ४० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. सकाळी साडेदहा वाजता हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी मुंबईल पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. हा पाऊस कोसळत असतानाच दादर येथील हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे सखल भागात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. पूर्व उपनगरातही पवई, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका आणि पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली आणि गोरेगाव परिसरातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने मुसळधार हजेरी लावली.
..............................
वातावरण धूसर
सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे काळोख झाला होता. शिवाय धो धो पाऊस कोसळत होता. परिणामी अशा वातावरणामुळे मुंबईतील वातावरण धूसर झाल्याचे चित्र होते.
..............................
घरी रहा, सुरक्षित रहा
पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या २४ तासांत पाऊस आणखी वाढेल. परिणामी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी रहावे, सुरक्षित रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
..............................
सकाळी १० ते ११ या वेळेत मलबार हिल, दादर, भायखळा, हाजी अली, सांताक्रूझ, विलेपार्ले, कुर्ला येथे पावसाचा जोर वाढतच होता. या काळात वरळी नाका, हिंदमाता, कफ परेड येथील धोबीघाट, चिराबाझार येथे पाणी साचले होते. तर काही रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.
..............................