लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयात मिळणारी कोव्हॅक्सिन लस आता पालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रांवरही मिळेल. साेमवार १५ मार्च राेजी हैदराबादहून कोव्हॅक्सिन तर पुण्याहून सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचे मिळून एकूण दीड लाख डोस येणार आहेत. यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
लसीकरण सुरू झाल्यापासून पालिकेच्या २४ लसीकरण केंद्रांसह राज्य सरकारच्या ४ आणि खासगी ३८ अशा ६६ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. यामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यातील ४५ ते ५९ वयोगटांतील सहव्याधी असणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. तीन टप्प्यांतील लसीकरणात आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून पाच लाखांहून जास्त डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी आगामी काळात लसीकरण केंद्रांची संख्या मुंबईत १०० हून जास्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
..........................