कोविडचा क्रुझ पर्यटनावर विपरीत परिणाम, ८४ जहाजांचे आगमन रद्द, मुंबईला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:52 PM2020-06-23T16:52:01+5:302020-06-23T16:52:29+5:30
कोविड 19 मुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
खलील गिरकर
मुंबई : कोविड 19 मुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. कोविड चा फटका बसल्याने मुंबई बंदरात येणार असलेल्या विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांना आपला प्रवासाचा बेत स्थगित करावा लागला. मुंबई बंदरात येण्याचे निश्चित झालेल्या तब्बल 84 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबई बंदराला बसला आहे.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबई बंदरात क्रुझ येण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. तेव्हापासून 31 मे पर्यंत मुंबई बंदरात आंतरराष्ट्रीय जहाजांच्या 25 फेऱ्या, देशांतर्गत जहाजांच्या 59 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. विदेशी जहाजांमधून मुंबई शहरात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण शून्यावर आल्यानो मुंबईतील पर्यटन व्यवसायाला देखील कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. साधारणत: 31 मे पर्यंत क्रुझचे आगमन सुरु असते. मात्र यंदा नेमक्या त्याच कालावधीत कोरोनाचा कहर झाल्याने लॉकडाऊन व विविध बंधनांमुळे क्रुझचे आगमन रद्द झाले. एका क्रुझच्या माध्यमातून बंदरात, शहरात सरासरी 1200 प्रवाशांचे आगमन होते. यंदा हे क्रुझ आले नसल्याने प्रवाशांचे प्रमाण शुन्यावर गेले.
नाविकांच्या सीऑफ च्या माध्यमातून बंदराला उत्पन्न एकीकडे क्रुझचे आगमन बंद झाल्याने व पर्यटन ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागणाऱ्या मुंबई बंदराला नाविकांच्या सीऑफ च्या माध्यमातून काही उत्पन्न मिळू शकले. जगाच्या विविध क्रुझवर असलेल्या नाविकांना काम संपल्यावर घरी सोडण्यासाठी विविध देशांतील क्रुझचे मुंबई बंदरात आगमन झाले. त्यामाध्यमातून बंदराला काही उत्पन्न मिळाले. लॉकडाऊन कालावधीत ( 20 जून पर्यंत) मुंबई बंदराद्वारे 7146 जण जहाजावरील काम पूर्ण झाल्याने घरी परतले. (साईन ऑफ) केले. तर 915 जण जहाजावरील कामासाठी रुजू झाले. (साईन इन) केले, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ ट्रँफिक मँनेजर व क्रुझ विभागाचे नोडल अधिकारी गौतम डे यांनी दिली.