देशभरातील हज हाऊस बनणार कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:14+5:302021-04-28T04:06:14+5:30
हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुऱ्या बेडमुळे ...
हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुऱ्या बेडमुळे रुग्णांचे हाल होत असताना हज कमिटी ऑफ इंडियाने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. देशभरातील विविध राज्यातील हज हाऊस आता कोरोनाचा रुग्णासाठी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कोरोना कोअर सेंटर म्हणून संबंधित राज्यांना दिले जाणार आहेत. हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद खान यांनी ‘लोकमत’ला याबाबत माहिती दिली.
देशातील विविध राज्यातील १४ हज हाऊसचा व कोविड सेंटरसाठी वापर केला जाईल, त्यामध्ये काही हजारावर रुग्णांची सोय करता येणार आहे. खान म्हणाले की, या भीषण संकटाचा सामना समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे केला पाहिजे. रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बेडमुळे मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या बंद असलेल्या हज हाऊसचा वापर रुग्णसेवेसाठी केला जाईल. अल्पसंख्याक विकास मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. देशातील विविध राज्यातील १४ हज हाऊसचा त्यासाठी वापर केला जाणार आहे. संबंधित राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाशी त्याबाबत चर्चा करून कार्यवाही करण्यास राज्य हज समितीला कळविण्यात आले आहे.
.............................