लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडले. विविध सामाजिक संस्था, संघटनांनी ऑनलाईन पद्धतीने योग दिनाचा कार्यक्रम घेण्यावर भर दिला, तर जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम झाले तिथे कोविड निर्बंधांचे पालन करत योग वर्ग आयोजित करण्यात आले.
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनात योग वर्ग
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योग वर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योग वर्गात सहभाग घेतला. मुंबईतील ‘द योग इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. योग इन्स्टिट्यूटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योगासने सांगितली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली.
नेहरू विज्ञान केंद्रातील योग वर्ग
मुंबईत वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातही योग दिवस साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ वीस जणांच्या उपस्थितीत योगासने, प्राणायम करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमोद कोकणे यांनी उपस्थितांना योगासन, प्राणायामांची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी नेहरू विज्ञान केंद्राचे प्रभारी संचालक उमेश कुमार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुष मंत्रालयाने ऐतिहासिक वारसा असलेल्या ७५ संस्थांमधील कार्यक्रमांचे आज थेट प्रक्षेपण केले होते. यात नेहरू विज्ञान केंद्रातील कार्यक्रमाचा समावेश होता.
नौदलाच्या पश्चिम विभागातही योग दिन साजरा
नौदलाच्या पश्चिम विभागातही योग दिन साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या मोहिमांच्या निमित्ताने समुद्रात असलेल्या युद्धनौकांसोबतच किनाऱ्यावरील नौदलाच्या आस्थापनांमध्ये योगासने, प्राणायामाचे वर्ग झाले. याशिवाय, पश्चिम विभागाच्या ''नेव्ही वाईव्हज् वेल्फेअर असोसिएशन''ने ऑनलाइन योग वर्ग घेतला. नौदलाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या कुटुंबांना यात सहभागी करून घेण्यात आले. यगासने, प्राणायामांची ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिके झाली. अनेकांनी आपापल्या घरी योगासने करत आपला सहभाग नोंदविला.
विवेकानंद केंद्राकडून राज्यभरात ऑनलाईन वर्ग
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या महाराष्ट्र प्रांताने आज ऑनलाईन पद्धतीने योग दिन साजरा केला. आजच्या योग दिनाच्या निमित्ताने मागील पंधरा दिवस महाराष्ट्रातील सर्व शाखांना पंधरा दिवसांचे ऑनलाईन योगसत्र आयोजित केले होते. यात विविध आसने, प्राणायाम, ध्यान आदी प्रशिक्षण देण्यात आले. आज या सत्रांचा समारोप करण्यात आला.