कोविड, हाथरस आणि अनुष्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:06 AM2020-12-08T04:06:43+5:302020-12-08T04:06:43+5:30
२०२० सालातील ट्विटरवरील सर्वाधिक ट्रेंडिंग विषय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेले आठ महिने अवघ्या जगाला कोरोना संक्रमणाचा विळखा ...
२०२० सालातील ट्विटरवरील सर्वाधिक ट्रेंडिंग विषय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेले आठ महिने अवघ्या जगाला कोरोना संक्रमणाचा विळखा पडला असतानाच, या कालावधीत अपेक्षेनुसार ट्विटरवरही कोविड हाच विषय सर्वाधिक ट्रेंडिंग विषय ठरला. हाथरस येथील दलित तरुणीवर झालेले अत्याचार आणि बाॅलीवूडचा स्टार सुशांतसिंह राजपूत आत्महत्येबद्दल ट्विटरवर सर्वाधिक हळहळ व्यक्त झाली, तर बाॅलीवूडची सुपरस्टार अनुष्का शर्मा गर्भवती असल्याचे विराट कोहलीने केलेले ट्विट ही या वर्षातली ट्विटरवरची सर्वाधिक गोड बातमी ठरली.
१ जानेवारी ते १५ नोव्हेंबर, २०२० या काळातील ट्विट, रिट्विट, लाइक्स, मिम्स यांचा ताळेबंद मांडून २०२० सालात ‘# धीस हॅपन्ड २०२०’ या अहवाल ट्विटर इंडियाने तयार केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली.
कोरोना संक्रमणाचे संकटाचा मुकाबला करण्यासाठी दीप प्रज्ज्वलन करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. ‘राजकारण’ या विषयात हे ट्विट सर्वाधिक रिट्विट झाले, तर पंतप्रधानांचे कौतुक करणारे महेंद्रसिंग धोनी याच्या ट्विटने क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट मिळविले. कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या लोकांना सावरण्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांनी दिलेली ५०० कोटींच्या मदतीचे ट्विट व्यापार क्षेत्रात सर्वाधिक गाजले. ‘वेअर अ मास्क’ या हॅशटॅगसह राबविलेली मोहीमही हिट ठरली. कोरोना योद्धांविषयी कृतज्ञता दर्शविणाऱ्या ट्विटचे प्रमाणत जगभरात २० टक्क्यांनी वाढले होते. डाॅक्टरांच्या कार्याला सलाम करणाऱ्या ट्विटची संख्याही १३५ टक्क्यांनी वाढली.
* मनोरंजन क्षेत्रात दक्षिणेचा प्रभाव
टीव्ही सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्राशी निगडित ७ हजारांपेक्षा जास्त ट्विट दर मिनिटाला जगभरात होत असतात. दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय याच्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले. ‘दिल बेचारा’ या हिंदी सिनेमापाठोपाठ ‘सरीलेरूनीकेववारु’ हा तेलगू आणि ‘सुरिपोटारू’ या तामिळ चित्रपटाचा बोलबाला ट्विटरवर होता. याच काळात सर्वाधिक ट्विट झालेल्या बिंदू या मिमनेही अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित उमटवले. रामायण, महाभारत या पौराणिक मालिकांनी या काळात कमबॅक केले. त्यांच्या आठवणी जागविणाऱ्या चर्चांनीही ट्विटचे व्यासपीठ व्यापले होते.
-सर्वाधिक रिट्विट - दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय याने चाहत्यांसह काढलेला सेल्फी
-सर्वाधिक लाइक्स - अनुष्का शर्मा गर्भवती असल्याचे विराट कोहलीने केलेले ट्विट
-सर्वाधिक चर्चेतले विषय - कोविड १९, सुशांतसिंह राजपूत आणि हाथरस
-क्रीडा क्षेत्रात ‘आयपीएल २०२०’ तर बाॅलीवूडमध्ये ‘दिलबेचारा’ हे हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत होते.
-सर्वाधिक ट्विट झालेले मिम – बिंदो
संपूर्ण जगात व्यापलेले कोरोना, त्या संकटाचा समर्थपणे मुकाबला करणारी व्यवस्था, निराशेच्या गर्तेतही आनंदाचे काही क्षणांची अनुभूती, मनोरंजक मिम्स, बाॅलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी अशा विविधांगी आणि आजवर कधीही न अनुभवलेल्या घडामोडींना ट्विटरवरील सहभागाची अनुभूती भारतीयांनी यंदा घेतली. आगामी वर्षांत सर्व व्यवहार पूर्वपदावर येतील आणि ट्विटर त्याच तडफेने ते लोकांपर्यंत पोहोचवील.
- मनिष महेश्वरी, संचालक, ट्विटर इंडिया
सर्वाधिक वापर झालेले ईमोजी - फोटो आहे.