अवघ्या ६० दिवसांत मालाड इथं उभारलं २१७० बेड्सचं कोविड रुग्णालय; MMRDA चं कौतुकास्पद कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:10+5:302021-06-29T08:13:07+5:30
रुग्णालयाचा पाया तळमजल्यापासून १० इंच उंच आहे. स्टीलच्या फ्रेम, डबल प्लायवूड आणि पीव्हीसी फ्लोअरिंग आहे.
मुंबई : एमएमआरडीएने अवघ्या दोन महिन्यांतच मालाडच्या वलनाई गाव येथे २१७० खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय बांधल्यानंतर सोमवारी ते मुंबई महानगरपालिकेकडे सुपुर्द केले. हे रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले असून ते अग्निरोधक आणि पर्यावरणास अनुकूल आहे.
रुग्णालयाचा पाया तळमजल्यापासून १० इंच उंच आहे. स्टीलच्या फ्रेम, डबल प्लायवूड आणि पीव्हीसी फ्लोअरिंग आहे. नामांकित कंपन्यांकडून रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा करण्यात आला आहे. या काेविड रुग्णालयात २,१७० खाटांची साेय असेल. यापैकी ७० टक्के ऑक्सिजन खाटा व २०० खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत. १९० खाटांचा अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन सुविधायुक्त १,५३६ खाटा, मुलांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग, २० खाटांचा डायलिसिस विभाग, ४० खाटांचे ट्रायजेज आणि ३८४ खाटांचा विलगीकरण कक्ष आहे.
हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली असून पोर्टेबल एक्स-रे, सीटी स्कॅनर, ईसीजी मशीन या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लिक्विड ऑक्सिजनच्या ४ टाक्या बसविण्यात आल्या आहेत.
२४० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी रुग्णालयात माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. डॉक्टर आणि प्रशासकीय कामांसाठी एक खोली तयार करण्यात आली असून तेथे उत्कृष्ट सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.
* बांधकामासाठी ५७ काेटींचा खर्च
रुग्णालयाच्या कामाची अंदाजे किंमत ९० कोटी रुपये असून त्यापैकी ५७ कोटी रुपये रुग्णालयाच्या बांधकामावर खर्च झाले आहेत. सुमारे ३३ कोटी रुपये हे वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी खर्च करण्यात आले असून आतापर्यंत एकूण खर्च ८९.६४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
-----------------------