अपर जिल्हाधिकाऱ्यांना कोविड संसर्ग, जिल्हा प्रशासनात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 05:55 PM2020-09-08T17:55:50+5:302020-09-08T17:56:07+5:30
तीन दिवसांकरिता कार्यालय सील
वर्धा : येथील अपर जिल्हाधिकाºयांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय तसेच अपर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय तीन दिवसांकरिता सील करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलाचा कोविड चाचणी अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पुढे येत कोविड चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनात ही बाब वाऱ्यासारखी पसरल्याने वरिष्ठांच्या सूचनेवरून खबरदारीचा उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय पुढील तीन दिवसांकरिता सील करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या काळात हे दोन्ही कार्यालय निर्जंतुक केले जाणार आहे.
निकट संपर्कातील व्यक्तींचा घेतला जातोय शोध
कोविड बाधित अपर जिल्हाधिकारी तसेच त्यांच्या मुलाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सध्या कोविड योद्धा म्हणून काम करणारे अधिकारी घेत आहेत. शिवाय या हायरिस्क कॉन्टॅक्ट व्यक्तींची कोविड चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.