मनोहर कुंभेजकर
मुंबई - गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व खाजगी रुग्णालये, क्लिनिक व नर्सिंग होम इत्यादींना कोविड-रूग्णांना पूर्व परवानगीशिवाय उपचार करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी गुजरात सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर त्वरित मार्गदर्शक सूचना जारी करा अशी मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना केली आहे. विशेष म्हणजे सीताराम कुंटे यांनी आपल्या पत्राची दखल घेत आज पत्राचे उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.
नोडल ऑफीसर नियुक्त करून खासगी रुग्णालयांना पूर्व परवानगीशिवाय उपचारासाठी कोविड रुग्णांना मान्यता दिल्यास कोविड रुग्णांना लवकर बेड मिळून त्यांच्यावर उपचार मिळतील. तसेच प्रशासनाकडून परवानगी मिळण्यासाठी होणारा विलंब टळेल, असे मत खासदार शेट्टी यांनी लोकमतकडे व्यक्त केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह रूग्णांचा चाचणी अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी सर्व प्रयोगशाळांना त्वरित मार्गदर्शक सूचना द्या, तसेच पालिका कार्यालयांना ताबडतोब किमान औपचारिकता व कार्यपद्धतीसह कोविडसाठी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचे आदेश त्वरित जारी करा, ब्रिज कोर्स इत्यादी अनेक स्त्रोतांकडून प्रतिनियुक्तीच्या आधारावर डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफची कमतरता त्वरित भरा, कोविडच्या पहिल्या लाटेत चालू असलेले सर्व कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करा अशा विविध सूचना खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पत्रात मुख्य सचिवांना केल्या आहेत.
कांदिवली पश्चिम येथील जैन मंदिरात उभारलेल्या पावनधाम कोविड सेंटर पुन्हा कोविडच्या दुसऱ्या लाटेत सुरू करण्यासाठी गेली 15 दिवस अडचणीचा सामना करावा लागला होता. पहिल्या कोव्हिड लाटेत येथे जवळजवळ २००० पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार केले होते. काल पालिकेच्या आर मध्य वॉर्ड कडून अखेर परवानगी मिळाली आणि आजपासून सदर केंद्र सुरू झाले, अशी माहिती त्यांनी पत्रात नमूद केली आहे.