कोविड प्रतिबंधक एक लाख ६० हजार लस पालिकेला प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:09 AM2021-08-21T04:09:58+5:302021-08-21T04:09:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे मागील दोन दिवस शासकीय आणि पालिका केंद्रांमध्ये लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे मागील दोन दिवस शासकीय आणि पालिका केंद्रांमध्ये लसीकरण बंद होते. गुरुवारी रात्री मुंबईला एक लाख ६० हजार २४० लसींचा साठा प्राप्त झाला आहे. या लसींचे वितरण सर्व सरकारी केंद्रात करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० लाख लाभार्थींपैकी ८२ लाख ४३ हजार ७८९ नागरिकांना लस मिळाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.
दरम्यान, लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस शासकीय व महापालिका केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. मात्र गुरुवारी रात्री महापालिकेला मिळालेल्या लस साठ्यामध्ये कोविशिल्डचे एक लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिनचे दहा हजार २४० डोस आहेत.
मुंबईतील एकूण लाभार्थी - ९० लाख
आतापर्यंत लस घेतलेले.... ८२ लाख ४३ हजार ७८९
पहिला डोस घेतलेले - ६१ लाख ५९ हजार ८९६
दोन्ही डोस घेतलेले - २० लाख ८३ हजार ८९३
आतापर्यंत यांनी लस घेतली....
आरोग्य सेवक, फ्रन्टलाइन वर्कर्स - ७,२७,७१५
ज्येष्ठ नागरिक - १७,२१,६४७
४५ ते ५९ वर्षे - २४,७३,५२६
१८ ते ४४ वर्षे - ३२,८४,८७७
गर्भवती महिला - ६७४
कोविशिल्ड - ७६,१४,४८५
कोव्हॅक्सिन - ६,०४,४७४
स्पुतनिक - २४,८३०