Coronavirus: रुग्णालयात असतानाही 'त्यांनी' सांभाळली कोविड सेलची जबाबदारी; म्हणाले, जीव वाचवणं महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:35+5:302021-05-20T10:46:13+5:30

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर रायवाडे यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली होती. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना पुन्हा कोविड सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.

Coronavirus: While in the hospital Police took care of the covid cell Responsibility | Coronavirus: रुग्णालयात असतानाही 'त्यांनी' सांभाळली कोविड सेलची जबाबदारी; म्हणाले, जीव वाचवणं महत्त्वाचे

Coronavirus: रुग्णालयात असतानाही 'त्यांनी' सांभाळली कोविड सेलची जबाबदारी; म्हणाले, जीव वाचवणं महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देमाझ्या जीवापेक्षा माझ्या सहकाऱ्याचा जीव वाचविणे जास्त महत्त्वाचेदोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित पोलिसांपर्यंत पोहोचवली मदतमूळचे नांदेडचे रहिवासी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रायवाडे २०१३ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झाले

मनीषा म्हात्रे

मुंबई : कोरोनाबाधित पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळेत उपचार मिळावे यासाठी धडपड सुरु असताना कोविड सेलमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रायवाडे यांनाच कोरोनाची बाधा झाली. मात्र कोरोनाही त्यांच्यापुढे कमजोर ठरला. सकारात्मक विचारांनी कोरोनाशी लढा देत त्यांनी रुग्णालयातूनही कोविड सेलची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. या कठीण प्रसंगातही माझ्या जीवापेक्षा सहकाऱ्यांचा जीव वाचविणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे वाटल्याचे रायवाडे सांगतात.

मूळचे नांदेडचे रहिवासी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रायवाडे २०१३ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झाले. सांताक्रुझ परिसरात ते कुटुंबीयांसोबत राहतात. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जिथे पोलिसांनाही बेडसाठी वणवण करावी लागत असल्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली. रायवाडे यांची तेथे नेमणूक करण्यात आली. गेले वर्षभर ते पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळीच उपचार मिळून देण्यासाठी धडपड करत होते.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर रायवाडे यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली होती. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना पुन्हा कोविड सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कसेबसे स्वतःला सावरले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४ एप्रिलला कोरोनाने रायवाडे यांना गाठलेच. त्यांना उपचारांसाठी कलिना येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

कोरोनावर उपचार घेत असतानाही कोरोनाबाधित पोलिसांचे कॉल रायवाडे यांना सुरुच होते. स्वतः उपचार घेत असतानाही जबाबदारी आधी म्हणत ते कोरोना बाधित पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कॉल स्वीकारुन संबंधितांसाठी बेड उपलब्ध करून देत होते. रायवाडे सांगतात, मी आजारी आहे म्हणून आपल्या सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. तसेच माझ्या आजारपणापेक्षा त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करणे जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कठीण काळात नागरिकांनी घाबरून न जाता, सकारात्मक राहणे गरजेचे आहे, असे ते आवर्जून सांगतात. उपचारानंतर ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. कोविड सेलद्वारे दीपक रायवाडे यांनी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळीच बेड मिळवून दिला आहे.

Web Title: Coronavirus: While in the hospital Police took care of the covid cell Responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.