Join us

कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळांची सुविधा देणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 2:05 AM

स्पाईस हेल्थच्या प्रयोगशाळांचे लोकार्पण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली आणि लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशांत कोरोनाचे नवे स्ट्रेन आढळून येत आहेत. त्यामुळे आजही रुग्णांचा शोध, संपर्कात आलेल्यांची तपासणी आणि उपचार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईसचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा राज्यात दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. ही संख्या आता ५०० वर नेली आहे. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राइव्ह हातात घेता येईल.या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त  ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासांत मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली. कार्यक्रमात स्पाईस हेल्थचे अ‍जय सिंह यांनी ही सुविधा सुरू करण्यामागची भूमिका सांगताना व्हॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे भविष्यात एचआयव्हीसह इतर आजारांच्या चाचण्याही करता येतील, अशी माहिती दिली.

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या