पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा उल्लेख नसेल, उदय सामंत यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:09 AM2020-09-18T02:09:12+5:302020-09-18T06:21:48+5:30
पदवी परीक्षांबाबत माध्यमांना सामंत यांनी सांगितले, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तरीही, अंतिम वर्ष परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच परीक्षा घेतल्या जातील.
मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी जसे प्रमाणपत्र दिले जाते तसेच प्रमाणपत्र यंदाही दिले जाईल. विद्यार्थी आणि पालकांनी याबाबत कोणताच संभ्रम करून घेऊ नये. कोणत्याच पदवी प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख नसेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पदवी परीक्षांबाबत माध्यमांना सामंत यांनी सांगितले, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तरीही, अंतिम वर्ष परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच परीक्षा घेतल्या जातील. उद्योग जगताकडून यंदाच्या पदव्यांबाबत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास अशा उद्योगांवर कठोर कारवाई करायला राज्य सरकार मागेपुढे पाहणार नाही.
दरम्यान, आज सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएननडीटी) महिला विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक झाली. विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्राध्यापक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
परीक्षा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा वाढीव कालावधी
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरला नाही अशा विद्यार्थ्यांनी आता १८, १९, २० सप्टेंबर २०२० या वाढीव तीन दिवसांच्या कालावधीत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सामंत यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबरपासून, तर २५ सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होतील.