Join us

कोविड संसर्गाच्या चढ-उतरणीचा पालिका करणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता स्थिरावत आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी मुंबई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता स्थिरावत आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिका जिनोम मॅपिंगच्या मदतीने कोरोनाच्या प्रादुर्भावाचा चढ-उतरणीचा अभ्यास करणार आहे.

शहर, उपनगरांतील काही विभागांची नियुक्ती करून त्या भागातील कोविड संसर्गाच्या स्थितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यात बी विभाग भेंडीबाजार, सी विभाग गिरगाव, एल कुर्ला विभाग आणि एम मानखुर्द, गोवंडी पूर्व या विभागांची निवड करण्यात आली आहे. या चार विभागांत प्रतिलाख तीन हजारांपेक्षा कमी रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे या विभागातील कोविडच्या संसर्गाचा तज्ज्ञांकडून अभ्यास करण्यात येईल. आर्थररोड येथील कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेत याविषयी संशोधन अभ्यास करण्यात येईल.

कोविड पॅझिटिव्ह नमुन्यांमधून लवकरात लवकर नवीन व्हेरिएंट, म्युटंटचा शोध घेणे हे प्रयोगशाळेच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्यामुळे जलदगतीने आराेग्य उपाययोजना करणे, आरोग्य यंत्रणेचे व्यवस्थापनही शक्य होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत विषाणूच्या मूळ स्थितीत बदल झाल्याने दुसरी लाट अधिक धोकादायक होती, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले होते.

पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, पालिकेने नियुक्त केलेल्या चार विभागांतून तेथील स्थानिक परिसरातील बाधितांची स्थिती, कोविड न झालेल्या व्यक्तींची आरोग्य स्थिती, तेथील स्थानिक लोकवस्तीतील जीवनशैली आणि आहार या सर्व मुद्यांवर आधारित माहिती गोळा करण्यात येईल, तसेच संसर्गाच्या स्थितीची तीव्रता, नियंत्रणात आल्याचा कालावधी या सर्व बाबींवर संशोधन करण्यात येईल.

..................................