Join us

कृपाशंकर सिंह सुटले; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोपमुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:10 AM

काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून आरोपमुक्तता करत विशेष पीएलएमए न्यायालयाने त्यांना बुधवारी मोठा दिलासा दिला. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारने मंजुरी न दिल्याने विशेष न्यायालयाने त्यांची आरोपमुक्तता केली.

मुंबई : काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून आरोपमुक्तता करत विशेष पीएलएमए न्यायालयाने त्यांना बुधवारी मोठा दिलासा दिला. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारने मंजुरी न दिल्याने विशेष न्यायालयाने त्यांची आरोपमुक्तता केली. त्यांचे चार नातेवाईक अद्यापही या प्रकरणी आरोपी आहेत. लवकरच तेही आरोपमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज दाखल करतील.आरोपी क्रमांक १ (कृपाशंकर सिंह) यांना आरोपमुक्त करण्यात येत आहे. अन्य सहआरोपींवर कायद्यानुसार खटला चालवावा, असे विशेष एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) न्यायालयाने म्हटले. कृपाशंकर सिंह यांनी २८ नोव्हेंबर २०१६ रोजी आरोपमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) कारवाई करण्यासंदर्भात सरकारकडून मंजुरी घ्यायला हवी होती. मात्र, मंजुरी न घेताच त्यांनी सिंह यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. हे बेकायदा असल्याने आरोपमुक्तता करावी, अशी विनंती सिंह यांनी अर्जात केली होती.सिंह यांच्यापाठोपाठ त्यांचे कुटुंबीय आरोपमुक्ततेचा अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सिंह यांच्या वकिलांनी दिली. सिंह सरकारी कर्मचारी होते. त्यांचे कुटुंबीय सरकारी कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असे सिंह यांच्या वकिलांनी सांगितले.ईओडब्ल्यूने गुन्हा नोंदवल्यानंतर तपासयंत्रणेने सिंह यांच्यावर २१ एप्रिल २०१५ला दोषारोपपत्र दाखल केले. सिंह यांची पत्नी मालतीदेवी सिंह, मुलगा नरेंद्र मोहन सिंह, जावई विजय सिंह आणि सून अंकिता सिंह हे यात सहआरोपी आहेत.

टॅग्स :कृपाशंकर सिंगमुंबईन्यायालय