ठाण्यातील कृष्णा इमारत का कोसळली?
By Admin | Published: August 5, 2015 01:44 AM2015-08-05T01:44:01+5:302015-08-05T01:44:01+5:30
बी - कॅबिन भागातील कृष्णा निवास इमारत ही धोकादायक यादीतही नसलेली इमारत कोसळल्याची घटना घडल्याने विविध प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत
ठाणे : बी - कॅबिन भागातील कृष्णा निवास इमारत ही धोकादायक यादीतही नसलेली इमारत कोसळल्याची घटना घडल्याने विविध प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आणि बाजूलाच असलेल्या इमारतीच्या पाडकाम कारवाईच्या वेळेस बसलेल्या हादऱ्यांमुळे ती पडल्याचे सांगितले जात आहे, मात्र तरीही काही प्रश्न अनुत्तरितच राहतात.
कृष्णा इमारत ही ५२ वर्षे जुनी असून, ती १९६३मध्ये उभारण्यात आली. या इमारतीची उभारणी झाल्यानंतर काहींनी आपापल्या खोल्यांमध्ये काही अंतर्गत बदल केले असल्यास त्याचाही परिणाम इमारत जीर्ण होण्यावर होऊ शकतो, असे बोलले जात आहे. दुसरीकडे या इमारतीच्या बाजूला असलेली कमळा भवन ही धोकादायक इमारत दोन महिन्यांपूर्वी पाडण्यास सुरुवात झाली आहे. ती इमारत पाडताना जे साहित्य वापरले जात होते, त्याच्या हादऱ्यांमुळेही या इमारतीला तडे गेल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. सोमवारी या इमारतीच्या तळमजल्यावर गाळ्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे दोन वेळेस इमारतीचा काही भाग कोसळला होता, मात्र त्याची दखल कोणीच घेतली नाही.
दरम्यान, दुसरीकडे ही इमारत पागडी पद्धतीची असल्याने त्यापोटी येणारे भाडेसुद्धा कमी होते़ त्यामुळे इमारतमालकाचे आणि विकासकाचे ही इमारत पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. परंतु भाडे कमी असल्याने रहिवासीही इमारत रिकामी करण्यास तयार नव्हते. त्यामुळे मालक आणि सदनिकाधारक असाही वाद या ठिकाणी सुरू होता, असे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. काही वेळेस जास्तीचा मलिदा मिळविण्यासाठीही मालक आणि विकासक अशा पद्धतीने या इमारतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
याशिवाय एखाद्या वेळेस रस्ते खोदाईचे काम जरी झाले तरी त्याच्या हादऱ्यांमुळेही आजूबाजूच्या घरांना त्याचे धक्के सहन करावे लागत असतात, असाही प्रकार घडला असल्यास इमारतींचे आयुर्मान कमी होऊन त्या पडण्याचा अधिक धोका असतो.
१तळमजला अधिक तीन मजल्यांची ही इमारत ५२वर्षे जुनी असून, ती १९६३ उभारण्यात आली होती. ही इमारत अधिकृत असून, त्यात राहणारे रहिवासी हे पागडी पद्धतीने येथे वास्तव्यास होते. तळमजल्यावर चहाची टपरी, पिठाची गिरणी आणि सुताराचे दुकान होते. पहिल्या मजल्यावर दोन आणि तिसऱ्या मजल्यावर दोन कुटुंबे वास्तव्यास होती. सोमवारी तळमजल्यावर काही अंतगर्त काम सुरू होते. त्याच वेळेस दुपारी दोनच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला होता.
२सायंकाळी पाच वाजतासुद्धा काही प्लास्टर पडल्याची माहिती या दुर्घटनेत बचावलेल्या अमृतलाल पटेल या चहावाल्याने दिली. परंतु एकानेही या विषयाची माहिती पालिकेला दिली नव्हती. रात्रीदेखील अमृतलाल यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या माधव बर्वे यांच्याकडे ‘इमारत गिरेगी तो नहीं’ अशी भीती व्यक्त केली होती. परंतु त्यांना काय ठाऊक काळाने त्यांच्या इमारतीचा दरवाजा ठोठावला होता. सर्वजण झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
३ही इमारत गुरखा पाटील यांच्या मालकीची असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांनी ती डेव्हलप करण्यासाठी १० वर्षांपूर्वी शांती ठाकूर या विकासकाला दिली होती. परंतु पाटील आणि त्यांचे जावई यांच्यात वाद झाल्याने हा मुद्दा न्यायालयात गेला होता. दरम्यान, यावर तोडगा निघाला होता, परंतु त्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली.
राजकीय नेत्यांच्या भेटी... पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, महापौर संजय मोरे, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली.
क्लस्टरची योजना न्यायप्रविष्ट असून, त्या संदर्भात राज्य शासनानेदेखील आपली बाजू न्यायालयात मांडली आहे. परंतु अशा घटना टाळायच्या असतील तर पुनर्वसन हाच यावरील उपाय आहे.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
भविष्यात अशा दुर्घटना घडून अपघात होऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ठाणे जिल्ह्यातील इमारतींसाठी क्लस्टर योजना, धोकादायक इमारतींसाठी पुनर्विकास योजना व सर्वसामान्यांना परवडणारी घरे या योजनांची शासनाने एकत्रित अंमलबजावणी करावी, यासाठी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. तसेच ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींबाबत आताच निर्णय न झाल्यास आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.
- प्रताप सरनाईक, आमदार शिवसेना
आम्ही सत्तेत असतानासुद्धा क्लस्टरसाठी आमच्या सरकारच्या विरोधात आंदोलने केली होती. परंतु सध्याच्या सरकारने मागील सहा महिन्यांत क्लस्टरसाठी आवाजच काढलेला नाही. त्यातही पागडी सिस्टीमची ही इमारत असल्याने या घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करावी. महापालिकेनेदेखील या इमारतींना दुरुस्तीची परवानगी द्यायला हवी़ त्यांनी अशा इमारतींचा सर्व्हे करून त्यांची मालकी निश्चित करावी.
- जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र
महापालिकेशी चर्चा करून यावर कशा पद्धतीने तोडगा काढला जाऊ शकतो, याची माहिती घेतली जाणार असून, या इमारतींचा बायोमॅट्रिक सर्व्हे करण्याची तयारी केली जाणार आहे. परंतु अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनीदेखील धोका टाळण्यासाठी आधीच इमारती खाली कराव्यात.
- संजय मोरे, महापौर ठामपा
अधिकृत इमारत असल्याने कारवाई करणे तसे शक्य नाही़ परंतु शहरातील अर्ध्याहून अधिक अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्या असून, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- संजीव जयस्वाल, आयुक्त, ठामपा
कृष्णा निवास पडण्याबद्दल अनेक मते व्यक्त केली जात आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये काही तरी बांधकाम सुरू होते. बहुदा त्यामुळेच इमारतीच्या ढाच्याला धक्का बसला असावा आणि त्यामुळेच कदाचित इमारत अचानक पडण्याची घटना घडली असावी
- अरविंद नेने, रहिवाशी