मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षीय मादी बिबट्या ‘कृष्णा’ ही आजारी आहे. तिच्यावर उद्यानातील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. कृष्णाच्या छातीत संसर्ग झाला असून गेल्या पाच दिवसांपासून तिच्या शरीरावर फोड आले असल्याचे निदान तेथील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. तिने मागच्या दोन दिवसांपासून काही खाल्ले नसून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिला सलाइन लावले असून औषधोपचार सुरू असल्याचे पेठे यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे बिबट्याचे आयुर्मान १२ ते १४ वर्षे असते. सध्या कृष्णाचे वय १८ वर्षे असून ती उद्यानातील सर्वात वृद्ध मादी बिबट्या आहे. १९९९ साली ‘कृष्णा’ला आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. रेस्क्यू सेंटरमध्ये ‘कृष्णा’ला हाक मारल्यावर ती लगेच प्रतिसाद देत असे, पर्यटकांची सर्वांत आवडती बिबट्या मादी अशी तिची प्रचिती असल्याचे येथील वनाधिकारी शैलेश देवरे यांनी सांगितले. शनिवारी ‘कृष्णा’ची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच उद्यानातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तिच्या भेटीसाठी धाव घेतली. २०१४ साली ‘कृष्णा’चा साथीदार ‘राजा’ बिबट्या मृत्यू पावला. त्यानंतर ती एकलकोंडी झाल्याचेही देवरे यांनी सांगितले. २०१४ साली ‘कृष्णा’ला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर उपचारानंतर तिची प्रकृती सुधारली होती. डिसेंबर, २०१६मध्ये उद्यानातील १६ वर्षीय वृद्ध बिबट्या अहमदनगरचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)
नॅशनल पार्कमधील ‘कृष्णा’ आजारी
By admin | Published: January 29, 2017 2:32 AM