मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आहे. पोलिस महासंचालक, अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलिस आयुक्त, सहआयुक्त, पोलिस अधीक्षक दर्जाच्या ६६ आयपीएस अधिकाऱ्यांना बदली, पदोन्नतीने नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना पोलिस महासंचालकपदावर बढती देत त्यांची राज्याच्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त शिरीष जैन यांना बढती देत राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे यांना याच पदाचा दर्जा वाढवून बढती देत अपर पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.मुंबई पोलिस दलातील वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांची राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य दहशतवादविरोधी विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांची वाहतूक सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिकमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक, तर त्यांच्या रिक्त जागी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची सहपोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे एस. डी. एनपुरे यांची नवी मुंबईत सहपोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. संरक्षण व सुरक्षा विभागाचे चंद्रकिशोर मीना यांची एटीएसच्या विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त पराग मनेरे हे पुन्हा ठाण्यात परतले आहेत. ठाणे शहर पोलिस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची पोलिस अधीक्षक नागरी संरक्षण विभाग ठाणे येथे तर, सशस्त्र पोलिस दलाचे अपर पोलिस आयुक्त आरतीसिंह यांची राज्य पोलिस प्रशासन विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलाच्या संवेदनशील अशा विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांची छत्रपती संभाजीनगर येथे विशेष पोलिस महानिरीक्षक, तर त्यांच्या जागी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांना बढती देत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे ए विक्रम देशमाने यांची पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण नियुक्ती, अन्न व संरक्षण विभागाचे सहआयुक्त समाधान पवार यांची मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पराग मनेरे पुन्हा ठाण्यात... राज्य गुप्तवार्ता विभागातील विशेष सुरक्षा विभागाचे उपायुक्त पराग मनेरे हे पुन्हा ठाणे पोलिस दलात परतले असून, त्यांची ठाण्यात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनेरे यांच्यासह पोलिस उपायुक्त/पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक पदावरील एकूण १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात संदीप जाधव आणि दत्तात्रय कांबळे मुंबईत, तर निमित गोयल यांची नागपूरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.