डोंबिवली: आमच्याकडून कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावण्याच्या बदल्यात कधी पैसे मागितले नाही. त्यांच्याविषयी करण्यात आलेला आरोप खोटा आहे असा दावा स्थानिक फेरीवाला महिलांनी केला आहे. कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात शनिवारी एक व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
या प्रकरणात फेरीवाल्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला गेला. एका महिलेने तिच्याकडून काही लोक स्टॉल लावण्याच्या बदल्यात जबरदस्तीने पैसे मागत आहेत असा आरोप करीत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी माजी नगरसेवक कुणाल पाटीलसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परंतू त्या परिसरातील अनेक फेरीवाला महिलांनी पुढे येत कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी कधीही फेरीवाल्यांकडून पैसे घेतले नाही. हा राजकीय षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे. कुणाल पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. फेरीवाल्यांनी काही महिन्यापूर्वी एक अर्ज दिला होता.
त्या अर्जात त्यांनी काही लोकांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप केला होता. मात्र पोलिसांनी त्या अर्जाचा तपास न करता कुणाल पाटील यांच्या विरोधात विनाकारण खोटा गुन्हा दाखल केल्याकडे फेरीवाला महिलांनी लक्ष वेधले आमच्या अर्जाची पोलिसांनी दखल घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.