पंकज पाटील, बदलापूरनिसर्गाचे वरदान लाभलेला धबधबा म्हणून कुंडेश्ववराची ओळख आहे. मात्र अनेक अति उत्साही पर्यटक उंचावरुन पाण्यात उड्या मारत असल्याने अशा पर्यटकांसाठी हा धबधवा जीवघेणाही ठरला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकापासून १० कि.मीच्या अंतरावर असलेल्या दहिवली गावाजवळील डोंगर द-यांमधून वाहणाऱ्या झऱ्यातून कुंडेश्वरचा धबधबा निर्माण झाला आहे. एकाच पसिरात दोन धबधबे असल्याने येथे भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येत असतात. २० फुटावरुन पडणाऱ्या या धबधब्यामुळे कुंडातील पाण्याखाली अनेक कपारी तयार झाल्या होत्या. या कपारीत अडकून अनेक पर्यटकांचे जीव येथे गेले होते. मात्र २००५ मध्ये आलेल्या महापुरामुळे या धबधब्यासोबत मोठ्या प्रमाणात दगड आणि वाळूही वाहून आली. त्याचा थर १५ फुटापेक्षा जास्त असल्याने येथील नैसर्गिक धबधब्यांची उंची कमी झाली. पूर्वी २० फुटावरुन पडणारा धबधबा आता केवळ ७ ते आठ फुटावरुनच वाहत आहे. त्यामुळे जीवघेण्या कपारी नष्ट झाल्याने हा धबधबा पर्यटकांसाठी सुरक्षित झाला. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरात संरक्षक कुंपण लावल्याने आणि पर्यटकांना सुरक्षितरित्या भिजता यावे यासाठी बंधारा बांधल्याने हा परिसर सेफ झाला आहे. मात्र असे असले तरी अनेक पर्यटक उंचावरुन उड्या मारत असल्याने त्यांच्यासाठी हा धबधवा आजही जीवघेणा ठरत आहे. या धबधब्याला लागूनच महादेवाचे प्राचिन शिवमंदिरही आहे.-या धबधब्यावर पोहचण्यासाठी रेल्वे स्थानकापासून थेट रिक्षा करावी लागते. ज्या पर्यटकांकडे स्वत:चे वाहन आहे अशा पर्यटकांनी बदलापूर- कर्जत माहामार्गावरुन खरवई गावाच्या दिशेने जावे. खरवई गावातून दहिवली गावाकडे जाण्यासाठी लहानसा डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावरुन दहिवली गावाकडे गेल्यास थेट आपले वाहन धबधब्यापासून १०० मीटरच्या अंतरावर नेता येते. -या धबधब्यावर आलेल्या पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी या ठिकाणी चेंजिंग रुमची सोय करण्यात आली आहे. दर शनिवार आणि रविवारी येथे पोलीस बंदोबस्त असल्याने पर्यटकांना कोणताही त्रास होत नाही. कुटुंबियांसोबत जाण्यासाठी हा धबधबा सर्वात उत्तम पर्याय ठरतो. -या परिसरात वडापाव, भजी, मक्याचे दाणे आणि वेफर्स विकणारी आदिवासीयांची लहान दुकाने सापडतील. मात्र जेवणाची सोय या परिसरात नसून त्यासाठी पुन्हा खरवई गावाकडे ५ किमी यावे लागेल. खरवई गावाच्या परिसरात असलेल्या धाब्यांवर आगरी पध्दतीचे जेवणाचा आस्वाद घेता येईल.
कुंडेश्वर धबधबा फुलला तरुणाईने!
By admin | Published: June 27, 2015 11:28 PM