कुर्बान हुसेन हेही हुतात्मेच; जाणून घ्या, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं मोलाचं योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 07:48 PM2020-07-17T19:48:58+5:302020-07-17T20:00:41+5:30

राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Kurban Hussein is also a martyr; Know their valuable contribution in the freedom struggle | कुर्बान हुसेन हेही हुतात्मेच; जाणून घ्या, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं मोलाचं योगदान

कुर्बान हुसेन हेही हुतात्मेच; जाणून घ्या, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं मोलाचं योगदान

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई - बालभारतीच्या पुस्तकात भगतसिंह यांच्यासोबत ज्यांचा उल्लेख झाला आहे. ते कुर्बान हुसेन हेही फासावर गेलेले क्रांतिकारक होते. १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी दिलेल्या सोलापुरातील चार हुताम्यांपैकी एक कुर्बान हुसेन हे होते. मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा अन् कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांचे पुतळे आजही सोलापुरात आहेत. या पुस्तकातून कुर्बान हुसेन यांचे नाव कमी करा, अशी मागणी होणे म्हणजे सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा अवमानच असेल, अशीही भावना सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे.

राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख केल्यानं गोंधळ उडाला आहे. इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु आणि कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही चूक झालीय का, याबद्दल अद्याप संभ्रम आहे. मात्र, कुर्बान हुसेन यांनीही देशासाठीच बलिदान दिलं आहे. त्यांच्या बलिदानाची साक्ष आजही सोलापूरातील हुतात्मा चौक महाराष्ट्राला, देशाला देत आहे. त्यामुळे, या पुस्तकातून कुर्बान हुसेन यांचं नाव न वगळता, सुखदेव यांच्या नावाचा नव्याने समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोलापूरकरांतील ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकारांनी केली आहे.

काय आहे उल्लेख?

“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?”
“बरोबर आहे” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”
मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “भारत माझा देश आहे” या पाठात या नावांमध्ये घोळ झाल्याची चूक निदर्शनास आल्यानंतर काहीसा गोंधळ उडाला.  

कोण आहेत कुर्बान हुसेन

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविण्यात आले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत, असे सांगण्यात येते. सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले. 

हुसेन यांची भाषा प्रभावी आणि परखड होती, ते एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते स्वत: गिरणी कामगार होते. स्वातंत्र्य लढ्यातील सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जी सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते. सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. दरम्यान, सोलापुरात आजही मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे हुतात्मा कुर्बान हुसेन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. हुसेन यांनी देशासाठी दिलेल्या कुर्बानीचा सोलापूरकरांना, महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान आहे.

Web Title: Kurban Hussein is also a martyr; Know their valuable contribution in the freedom struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.