मुंबई : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज मीरारोड येथील स्मशानभुमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोकणासह राज्याच्या इतर भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी 'भारत माता की जय', 'कौस्तुभ राणे अमर रहे' या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले होते. शहीद कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी श्रीनगर येथून विमानाने दु. 2.15 वाजता दिल्लीला आणण्यात आले होते. दिल्लीहून विमानाने ते संध्याकाळी मुंबईत आणण्यात आले. बुधवारी रात्रभर मालाड येथे शवगृहामध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 11 वाजेपर्यंत त्यांच्या मीरारोड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
गुरुवारी दुपारी 12.15 वाजता शहीद कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद राणे हे मुळचे सिंधुदुर्गमधील वैभववाडीचे सुपुत्र असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज पार्थिवाचे दर्शन घेत कुटुंबियांचे सांत्वन केले.