मुंबई : गावठाण व कोळीवाड्यांची गणना झोपडपट्टी क्षेत्रामध्ये करण्यात आल्याचा विकास आराखड्यातील घोळ उजेडात आल्यानंतर आणखी एका गोंधळाने मरोळ गावठाणच्या रहिवाशांची झोप उडवली आहे़ २०१४-२०३४ च्या विकास आराखड्यात सार्वजनिक रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे़ परंतु या रस्ता रुंदीकरणात या गावातील काही घरे, पालिका शाळा आणि ख्रिस्ती धर्मीयांची प्रार्थनास्थळे विस्थापित होणार आहेत़ पुढील २० वर्षांकरिता मुंबईचा विकास करताना कोणती काळजी घ्यावी, हा विकास कसा असावा यावर बारकाईने अभ्यास करून आराखडा तयार केल्याचा दावा केला जात आहे़ परंतु आराखड्यातील त्रुटी व गोंधळ पाहता यात बारकाईनेच काय तर अभ्यास तरी झाला होता का, असा संतप्त सवाल विविध स्तरांतून होत आहे़ यापैकीच एक धक्कादायक प्रकार म्हणजे मरोळ गावठाणमधील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव़विकास आराखड्याचा सर्वेक्षण नकाशा पाहिल्यानंतर मरोळ गावठाणमधील रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे़ येथून प्रस्तावित ९़१५ मीटरचा रस्ता त्यांच्या घराच्या जागी दाखविण्यात आला आहे़ एवढेच नव्हे तर के पूर्व विभागाच्या विद्यमान भूवापर नकाशातही गावठाणाचा नामोनिशाण नाही़ गावठाणमधील घरांना झोपडपट्टी व क्लस्टर म्हणून दाखविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
मरोळ गावठाणावर कुऱ्हाड
By admin | Published: April 03, 2015 3:16 AM