मजगावात पोलिसावर कुऱ्हाडीने हल्ला
By Admin | Published: July 1, 2014 11:27 PM2014-07-01T23:27:51+5:302014-07-01T23:27:51+5:30
मजगाव ग्रामपंचायत हद्दीतील अरावघर भागात एका जागेची मोजणी सुरू होती. यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता
नांदगाव : मजगाव ग्रामपंचायत हद्दीतील अरावघर भागात एका जागेची मोजणी सुरू होती. यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता. परंतु मोजणी प्रक्रिया संपल्यानंतर आरोपी जनार्दन काबुकर यांना ही मोजणी मंजूर न झाल्याने संतप्त झालेल्या काबुकर यांनी पोलीस हवालदार मनवे यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर व उजव्या खांद्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अचानक अशा घटनेमुळे संपूर्ण मुरुड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी ४ वाजता अरावघ-मजगाव येथील अमृताकुमार सहस्त्रबुद्धे यांच्या जागेची मोजणी पोलीस बंदोबस्त सुरू होती. जागा मोजणीचे काम सुरू असताना जनार्दन काबुकर हे या ठिकाणी आले व मोजणीत अडथळा निर्माण करून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले. तेथे असलेल्या गोठ्यातून लोखंडी कुऱ्हाड घेवून पोलीस कॉन्स्टेबल अविनाश वाघमारे यांच्या पाठीमागे धावू लागले. यावेळी पोलीस हवालदार मनवे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता काबुकर यांनी मनवे यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर व उजव्या खांद्यावर वार करून पलायन केले. त्यांना सिव्हिल रुग्णालय, अलिबाग येथे हलविण्यात आले आहे. आरोपी काबुकर मात्र फरार झाला आहे.