कुर्ला-अंधेरी जोडरस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:49 AM2020-08-10T01:49:22+5:302020-08-10T01:49:24+5:30
जरीमरी सिग्नलजवळ सर्वात जास्त प्रमाणात खड्डे
मुंबई : कुर्ला अंधेरी जोडरस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवस पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. जरीमरी सिग्नलजवळ सर्वात जास्त प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे येथे वारंवार दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. तर रिक्षा, टेम्पो यांसारखी वाहने या खड्ड्यांमध्ये फसत आहेत.
वाहनांचा वेग मंदावल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा खड्ड्यात अडकलेले वाहन जागीच थांबून राहत असल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक होतो. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. काही जण मुंबई विमानतळावर जाण्यासाठी देखील या मार्गाचा वापर करतात. अशा वेळेस येथील खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.