Join us

कुर्ला बनतोय ‘हॉटस्पॉट’, कोरोना झपाट्याने पसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 2:30 AM

कोरोना झपाट्याने पसरतोय : एल वॉर्डमध्ये ३ हजार रुग्ण; महापालिका अपयशी

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बहुतांश ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी यश येत असले तरी मोठ्या प्रमाणावर चाळी आणि झोपड्या असलेल्या एल वॉर्डमध्ये म्हणजे कुर्ला परिसरात अद्यापही कोरोनाला रोखण्यासाठी म्हणावे तसे यश आलेले नाही. बुधवारच्या महापालिकेकडील आकडेवारीनुसार, एल वॉर्डमध्ये ३ हजार २१० कोरोना रुग्णांची नोंद आहे. यापैकी १ हजार ५२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची नोंद १ हजार ५८२ एवढी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांना सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले जात असूनदेखील नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने अडथळे वाढत असल्याचे चित्र आहे.

एल वॉर्डमधील कुर्ला येथे साकीनाका, काजूपाडा, जरीमरी, कमानी, बैलबाजार, वाडिया इस्टेट, ख्रिश्चन गाव, शीतल सिग्नलसह पवई पोलीस ठाणे परिसर, साकीनाका म्हाडा कॉलनी, संघर्षनगर, असल्फा, मोहील व्हिलेज, साकीनाका पोलीस ठाणे परिसर, कृष्णानगर, पाइपलाइन रोड, लिंक रोड, क्रांतीनगर, कुर्ला बेस्ट बस आगार परिसर, कपाडिया नगर, टिळकनगर, ब्राह्मणवाडी, नेहरूनगर, कसाईवाडा, चुनाभट्टी आणि कुर्ला रेल्वे स्थानक एवढा परिसर येतो. येथे मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने वस्ती आहे.येथील चाळी, झोपड्या आणि इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असून, मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या अडीच महिन्यांपासून येथील खासगी रुग्णालये आणि दवाखने बंद होती. आता काही प्रमाणात येथील खासगी दवाखने पुन्हा सुरू झाले असून, येथील लोकसंख्येला आरोग्याच्या सुविधा तोकड्या आहेत. येथील बहुतांश भागात साफसफाई झालेली नाही.विशेषत: मिठी नदीच्या परिसरात अनेक ठिकाणी कामे झालेली नाहीत. येथील बहुतांशी घरे दुमजली असून, बहुतांश चाळी या तीन मजली आहेत. कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा येथील लोकप्रतिनिधींनी नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले होते. मात्र बहुतांश ठिकाणी नियम पाळले गेले नाहीत. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत दरवर्षी वाढ होते. मलेरिया, डेंग्यू रुग्णांमध्ये साधारणत: तापाची लक्षणे सारखी दिसतात. संसर्गजन्य आजारावरसुद्धा सोशल डिस्टन्सिंग हा उत्तम पर्याय आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.येथे घ्या खबरदारी, कारण...च्जोगेश्वरी, कांदिवली आणि बोरीवली येथे मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळी आहेत.च्मालाड मालवणी येथील परिसर झोपड्यांनी व्यापला आहे.च्रेतीबंदरसह शिवडीकडील परिसर झोपड्यांनी व्यापला आहे.च्मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथे तर मोठ्या प्रमाणावर झोपड्य आहेत.च्वडाळा येथील कोरबा मिठागरसह माहीम परिसरात झोपड्या आणि बैठ्या चाळी आहेत.च्कुलाबा येथील बधवार पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर बैठी वस्ती आहे.च्घाटकोपर आणि मुलुंडचा बहुतांश परिसर हा डोंगर उतारावर वसला असून, यात झोपड्यांसह चाळींचा समावेश आहे.च्विमानतळालगत मोठ्या प्रमाणावर झोपड्या वसल्या असून, यात कालिना, सांताक्रुझ, कुर्ला, विलेपार्ले, मरोळ परिसराचा समावेश आहे़

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या