Join us  

कुर्ल्यातील हार्बर होणार एलिव्हेटेड

By admin | Published: May 25, 2016 2:53 AM

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग हे एलिव्हेटेड (उन्नत) करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या या नव्या प्रस्तावात कुर्ला स्थानकात एलिव्हेटेड हार्बर स्थानक बांधतानाच तीन

- सुशांत मोरे,  मुंबई

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग हे एलिव्हेटेड (उन्नत) करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या या नव्या प्रस्तावात कुर्ला स्थानकात एलिव्हेटेड हार्बर स्थानक बांधतानाच तीन प्लॅटफॉर्म उभारले जातील. त्यानुसार कुर्ला टर्मिनसही केले जाणार असून एका प्लॅटफॉर्ममधून पनवेल, वाशीला जाणाऱ्या लोकल सोडण्यात येतील. त्यामुळे सीएसटीमधून सुटणाऱ्या हार्बरच्या गाड्यांवरील ताणही बराचसा कमी होण्यास मदत मिळणार आहे. नव्याने बांधण्यात येणारा एलिव्हेटेड मार्ग कसाईवाडा ते टिळकनगर असा असेल. मध्य रेल्वेवर कुर्ला ते सीएसटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग तयार केला जाणार आहे. मात्र ही मार्गिका कुर्ला ते सीएसटीपर्यंत आणताना जागेची अडचण सतावत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्यात येतील. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका असल्या तरी त्या मार्गिका मालवाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रस्तावानुसार हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म आठ मीटर वर उचलण्यात येतील आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गिकेला जागा मोकळी केली जाईल. हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधतानाच त्यासोबत आणखी एक प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. असे हार्बरचे एकूण तीन प्लॅटफॉर्म कुर्ला स्थानकात एलिव्हेटेड बांधतानाच तेथे तिकीट बुकिंग खिडक्या आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. दोन प्लॅटफॉर्मवरून सध्या धावत असलेल्या सीएसटी ते पनवेल अशा नियमितपणे लोकलच जातील. तर एक प्लॅटफॉर्म हा टर्मिनस म्हणून बांधण्यात येणार असल्याने यामधून पनवेल, वाशीसाठी लोकल सुटतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे कुर्ला स्थानकातून सुटणाऱ्या या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळेल आणि सीएसटीमधून सुटणाऱ्या हार्बरच्या गाड्यांवरीलही बराचसा ताण कमी होईल. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मालवाहतुकीमुळे होणारी अडचण संपणारकसाईवाडा ते टिळकनगरपर्यंत एलिव्हेटेड मार्ग बांधण्यासाठी तीन वर्षे तर कुर्ला स्थानकातील नवे हार्बर स्थानक उभारण्यासाठी एक वर्ष लागेल. रेल्वे उड्डाणपूल बांधल्यानंतर हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ हार्बर मार्गावर उतरविण्यात येईल आणि नंतर सध्याच्या मार्गाला जोडण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे कुर्ल्यातील हार्बर मार्ग एलिव्हेटेड झाल्यानंतर बीपीटीतून येणाऱ्या मालवाहतुकीमुळे हार्बर लोकलला होणारी अडचण संपुष्टात येईल आणि हार्बरचा प्रवास सुरळीत होईल.