कुर्ला-हुबळी एक्स्प्रेस रोज रात्री धावणार
By admin | Published: December 13, 2015 11:25 PM2015-12-13T23:25:05+5:302015-12-14T00:02:42+5:30
नवीन वर्षाची भेट : मुंबईतून मिरजेकडे येण्यासाठी सोय
मिरज : लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला (मुंबई) ते हुबळी ही कुर्ल्यातून सकाळी सुटणारी एक्स्प्रेस नव्या वर्षात १३ मार्चपासून दररोज रात्री धावणार आहे. यामुळे मुंबईतून मिरजेकडे येण्यासाठी दररोज रात्री चार एक्स्प्रेसची सोय झाली आहे. कुर्ला एक्स्प्रेस रात्री सुटणार असल्याने पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल होणार आहे. १३ मार्चपासून कुर्ला एक्स्प्रेस मुंबईतून सकाळी नऊऐवजी सायंकाळी ६.४५ वाजता मिरजेला येणार आहे. प्रवाशांसाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. नव्या वेळापत्रकानुसार दररोज सायंकाळी कुर्ल्यातून निघालेली हुबळी एक्स्प्रेस पुण्यात रात्री अकरा वाजता व पहाटे ५.२५ वाजता मिरजेत येईल. सकाळी अकरा वाजता हुबळीमध्ये पोहोचेल. सध्या सकाळी नऊ वाजता ती कुर्ल्याहून सुटते. दुपारी १.१० वाजता पुण्यात आणि सायंकाळी ७.५० वाजता मिरजेत येते. नव्या वेळापत्रकामुळे महालक्ष्मी, सह्याद्री आणि चालुक्य एक्स्प्रेससोबत कुर्ल्यातून आणखी एक रात्रीची गाडी उपलब्ध झाली आहे. दिवसा धावणाऱ्या कुर्ला-हुबळी एक्स्प्रेसला प्रतिसाद कमी आहे. कोयना एक्स्प्रेसही मुंबईतून सकाळी येत असल्याने कुर्ला-हुबळी गाडी मिरजेतून पुढे भरून जात होती. नव्या वेळापत्रकानुसार कुर्ला-हुबळी एक्स्प्रेस रात्री मुंबईतून सुटणार असल्याने तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
एर्नाकुलमच्या वेळेत बदल
कुर्ला-हुबळी रात्री धावणार असल्याने शनिवारी व रविवारी धावणाऱ्या पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पुण्यातून रात्री ११.१० वाजता सुटणारी एर्नाकुलम एक्स्प्रेस रात्री ११.३० वाजता सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस कुर्ला एक्स्प्रेसच्या पाठोपाठ ५.३० वाजता मिरजेत पोहोचणार आहे.