कुर्ल्यातील तपासणीत २८पैकी २१ गाळे, गोदामे ठरली विनापरवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:49 AM2020-01-08T00:49:22+5:302020-01-08T00:49:28+5:30
गेल्या आठवड्यात साकीनाका, खैरानी रोडवर लागलेल्या आगीनंतर महापालिकेने कुर्ल्यातील गाळे, गोदामे, हॉटेल्सची झाडाझडती सुरू केली आहे.
मुंबई : गेल्या आठवड्यात साकीनाका, खैरानी रोडवर लागलेल्या आगीनंतर महापालिकेने कुर्ल्यातील गाळे, गोदामे, हॉटेल्सची झाडाझडती सुरू केली आहे. या तपासणीत २८पैकी २१ गाळे, गोदामे विनापरवाना सुरू असल्याचे समोर आले़ त्यानुसार या गाळ्यांना नोटीस पाठवल्या असून लवकरच टाळे ठोकण्याची कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खैरानी रोडवरील औद्योगिक वसाहत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली़ यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. मात्र या आगीमुळे आसपासच्या रहिवासी परिसरांमध्येही धोका निर्माण झाला होता़
त्यामुळे रासायनिक कारखाने लोकवस्तीतून हद्दपार करण्याची मागणी जोर धरू लागली़ पालिकेच्या एल विभाग कार्यालयाने कुर्ला येथील अनधिकृत गोदामांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे़ खैरानी रोड मार्गावर मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने तसेच गोदामे वखारी, धाबे, हॉटेल्सचे आहेत. गेल्या दोन दिवसांत महापालिकेने २८ आस्थापनांची तपासणी केली.
>चार वर्षांपूर्वी कुर्ला येथील सीटी किनारा हॉटेलच्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्व आस्थापने, बांधकामांची झाडाझडती घेऊन कारवाई केली होती.
कालांतराने पालिकेची कारवाई थंडावल्याने पुन्हा येथे अनधिकृत व्यवसायांना पेव फुटले आहे़
दोन वर्षांपूर्वी खैरानी रोड येथील भानू फरसाण कारखान्याला आग लागून १३ लोकांचा मृत्यू झाला होता़
आतापर्यंत २८ गोदामे, आस्थापनांची तपासणी करून २१ ठिकाणी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तर काही अनधिकृत सामान जप्तही करण्यात आले आहे़ नियमानुसार या गाळ्यांना सील करण्यात येईल, असे एल विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांनी सांगितले़