मुंबई : कुर्ला पूर्व येथील नेहरूनगर परिसरातील धम्म कुटी बुद्ध विहार येथील पोलीस वसाहत इमारत क्रमांक १३५ ची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या खोल्यांमधील सिलिंगची मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याने इमारतीमधील कुटुंबांना ऐन दिवाळीत अंधारात राहण्याची वेळ आहे.
नेहरूनगर परिसरात म्हाडाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता एकूण १० इमारती बांधल्या होत्या. कुर्ला दूध डेअरीसमोर असलेली इमारत क्रमांक १३५ मोडकळीस आली आहे. या इमारतीत एकूण ४० कुटुंबे राहात होती. परंतु आज या इमारतीत सहा कुटुंबे राहात आहेत. या कुटुंबांचे अद्यापही चांगल्या घरांत पुनर्वसन केले नसल्याने रहिवाशांना त्याच इमारतीत राहावे लागत आहे. सोमवारी सकाळी ठीक ९.४६ वाजण्याच्या सुमारास दुसºया मजल्यावरील एका खोलीतील सिलिंगचे प्लास्टर अचानक कोसळले़ त्यामुळे या इमारतीतील कुटुंबे भयभीत झाली आहेत. याबाबत अग्निशामक दलास पाचारण केले असता त्यांनी घटनास्थळी येऊन सिलिंगचे निखळलेले प्लास्टर काढून टाकले आणि वीजपुरवठा बंद केला. तो अद्याप सुरू केला नसल्याने या कुटुंबांना घराबाहेर झोपावे लागत आहे. गेल्या वर्षी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात इमारतीची डागडुजी करणे गरजेचे असल्याचे सांगितले गेले होते. जून महिन्यात ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले.
इमारतीमधील सहा कुटुंबांना चांगल्या स्थितीत नसलेल्या खोल्या दिल्या आहेत. त्यामुळे ही सहा कुटुंबे अद्याप चांगल्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. आमच्या घरातील सिलिंगचे प्लास्टर सतत कोसळत आहे. आमच्या जीवाला धोका आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे व आम्हाला चांगल्या स्थितीत असणारी घरे देण्यात यावीत, अशी मागणी पोलीस कुटुंबीय करीत आहेत.