Join us

कुर्ला रेल्वे स्थानक... नको रे बाबा! गर्दीचा महापूर; सहा पुलांपैकी सर्वाधिक वापर केवळ तीन पुलांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 3:51 AM

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे.

सचिन लुंगसे मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. उत्तरेसह दक्षिणेकडील पुलांचा वापर होत असला तरी तुलनेने तो कमी असून, मधल्या पुलावरील गर्दीचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर मधल्या पुलावर केवळ दोन आरपीएफ जवान तैनात करण्यात येत असून, संबंधितांना ही गर्दी आवरणे आवाक्याबाहेर आहे. परिणामी उर्वरित पुलांचा वापर वाढविणे, गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि यासाठी येथे प्रवाशांमध्ये जनजागृती करणे हे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असून, येथे प्रशासन कमी पडले तर मात्र एल्फिन्स्टनची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.मुंबई शहराची सीमा शीव (सायन) येथे संपते आणि येथूनच उपनगराला सुरुवात होते. लाल बहादूर शास्त्री मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ आणि अंधेरी हे परिसर कुर्ला पश्चिम परिसरात येतात. चेंबूर, वडाळा येथे कुर्ला पूर्वेहून जाणे सोयीचे ठरते. मागील दहा वर्षांत कुर्ला पश्चिमेकडील वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ आणि अंधेरी येथील कॉर्पोरेट कंपन्यांची संख्या वाढली आहे. परिणामी कर्मचारी वर्गाची संख्या वाढली आहे. शिवाय कुर्ला, सांताक्रूझ आणि अंधेरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर भंगारसह लघुउद्योगांची संख्या अधिक आहे. हीच परिस्थिती चेंबूर आणि वडाळा येथे आहे. येथे काम करणारा कर्मचारी कुर्ला रेल्वे स्थानकावर उतरत असून, सकाळी ८ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत कुर्ला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी असते.कुर्ला रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेचे एकूण सहा फलाट असून, हार्बर रेल्वेचे दोन फलाट आहेत. फलाट क्रमांक १ ते ६ मध्य रेल्वेसाठी तर फलाट क्रमांक ७ आणि ८ हार्बर रेल्वेसाठी आहे. रेल्वे प्रशासनाने आठ फलाटांना जोडण्यासाठी तब्बल सहा पूल बांधले आहेत. मात्र मधले तीन पूल वगळले तर उर्वरित तीन पुलांचा तुलनेपेक्षा कमी वापर होत आहे. मधला एक पूल सर्वात जुना असून, या पुलाचे जिने अरुंद आहेत. फलाट क्रमांक ४, ६, ७ आणि ८ वर सकाळी भरून येणाºया लोकलमधील गर्दी उतरत असते. तर फलाट क्रमांक १, ५ आणि ७ वर सायंकाळसह रात्री भरून येणाºया लोकलची गर्दी उतरते. मुळात या सर्व फलाटांवर उतरत असलेले प्रवासी सातत्याने अरुंद असलेल्या मधल्या जिन्याचा वापर करतात. परिणामी येथील गर्दीत भर पडते आणि एक गाडी आल्यावर जिन्यावर झालेली गर्दी किमान दहा मिनिटे कायम असते.मुळातच मधल्या जिन्यासह लगतच्या आणखी एका जिन्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे उर्वरित नव्या पुलांची निर्मिती केली आहे. यातील एक नवा पूल ठाणे दिशेकडे आहे. दुसरा नवा पूल मध्यभागी आहे, तर तिसरा पूल सायन दिशेकडे आहे. ठाणे आणि सायन दिशेकडील दोन्ही नवे पूल उत्तम असले तरी एका कोपºयात त्यांची जागा असल्याने घाईगडबडीत असलेले रेल्वे प्रवासी याचावापर करणे टाळतात. मध्यभागी असलेल्या एका नव्या पुलाचा वापर वाढत असला तरी त्याचे प्रमाण कमी आहे.परिणामी जुन्या पुलाचा वापर कमी व्हावा. येथील गर्दीला उर्वरित पुलांकडे वळते करता यावे; यासाठी फलाटांवरच आरपीएफचे जवान तैनात करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र आरपीएफचे जवान पुलावर तैनात असतात. या कारणाने फलाटावर सकाळी आणि सायंकाळी झालेली गर्दी हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.फेरीवाल्यांचे काय?कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर कायमच फेरीवाल्यांचे बस्तान असते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर येथील फेरीवाल्यांना हटविण्यात आले असले तरी पंधरा दिवसांनी पुन्हा ते तेथे ठाण मांडणार नाहीत, याची शाश्वती कोणीच देत नाही. पूर्व आणि पश्चिमेकडील जिन्यांलगतही फेरीवाले कायमच ठाण मांडून बसतात. परिणामी प्रवाशांसह वाहनचालकांना मनस्ताप होतो आणि गर्दी नियंत्रणाबाहेर जाते; ही समस्या कायमची सोडविण्याची गरज आहे.- राकेश पाटील, माजी सचिव, भाजपा, कालिना विधानसभाभुयारी मार्गाचा वापर नीट झाला पाहिजेबहुप्रतीक्षित कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाºया कुर्ला सबवेचे काम पूर्ण झाले असून, लवकरच तो नागरिकांसाठी खुला होणार आहे. मध्य रेल्वेने या कामी ३.८४ कोटी खर्च केले आहेत. सबवेचे काम हे गेल्या चौदा वर्षांपासून सुरू आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाअभावी काम रखडलेले होते. सबवेची एकूण लांबी १२९.९० मीटर, रुंदी ७.६० मीटर आणि उंची २.६० मीटर आहे. पालिकेने या कामी २ कोटी ९४ लाख ८८ हजार ३८३ रुपये खर्च केले असून, मध्य रेल्वेने ३ कोटी ८४ लाख ४३ हजार रुपये खर्च केले आहेत. पण आता याचा वापर नीट झाला पाहिजे. - अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ताशिवसेना गप्प का?प्रभाग समिती अध्यक्षपदावर असताना आणि आता महापालिकेच्या बैठकांमध्ये मी वारंवार रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर आवाज उठविला आहे. महापालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. मात्र प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात येत नाही. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ठाण्यात सेनेने ठाणेकरांसाठी उपाययोजना केल्या आहेत. मग मुंबईत शिवसेना मुंबईकरांसाठी रेल्वेबाबतच्या उपाययोजना का करत नाही, असे माझे म्हणणे आहे. कुर्ल्याचा दररोजचा आकडा ७५ हजार प्रवासी, ५ लाख वाहने याहून अधिक आहे. गर्दीचे व्यवस्थापन करणे हा मुख्य मुद्दा आहे. बीकेसी, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरीकडे जाणाºया गर्दीचे व्यवस्थापन करणे हा उपाय आहे आणि तो केलाच पाहिजे.- डॉ. सईदा खान, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

टॅग्स :आता बासमुंबई लोकलएलफिन्स्टन चेंगराचेंगरी