‘मटेरियल’अभावी कुर्ला गेले खड्ड्यांत, आयुक्त इकडे लक्ष द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:47 AM2018-07-17T01:47:08+5:302018-07-17T05:51:37+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची ४८ तासांची मुदत केव्हाच संपली असून, अद्यापही येथील खड्डे बुजविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची ४८ तासांची मुदत केव्हाच संपली असून, अद्यापही येथील खड्डे बुजविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या कुर्ला येथील ‘एल’ वॉर्डमध्येही खड्ड्यांचा महापूर आला असून, येथील खड्डे बुजविण्यासाठी मटेरियल नाही, असे म्हणत प्रशासनाने ते डेब्रिजने बुजविले आहेत. परिणामी, भर पावसात डेब्रिजने बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले. कोल्डमिक्सने बुजविलेल्या खड्ड्यांची स्थिती फार काही उत्तम नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सायनपासून घाटकोपरपर्यंतच्या सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही कुर्ला खड्ड्यांतच गेल्याचे चित्र आहे.
मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा लालबहादूर शास्त्री मार्ग सायनपासून सुरू होतो. या रस्त्याचा सायनपासून घाटकोपरपर्यंतचा आढावा घेतला असता, महाराष्ट्र नेचर पार्कच्या सिग्नलवर नागरिकांना खड्ड्यांना सामोरे जावे लागते. येथून पुढील प्रवासादरम्यान कुर्ला डेपो, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडदरम्यानच्या कुर्ला डेपो येथील सिग्नलच्या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याच अगोदर कुर्ला येथील न्यू मिल रोडवरील श्री कृष्ण चौक आणि वांद्रे-कुर्ला संकुलात जाण्यासाठी लागत असलेल्या सिग्नलवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. कुर्ला डेपोपासून थोडे पुढे आल्यावर कल्पना सिनेमागृहालगतच्या परिसरात कालिना येथे जात असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांनी ठाण मांडले आहे. येथून पुढे बैलबाजारला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यालगत खड्डे आहेत. हॉलीक्रॉसलगतच्या सिग्नलसह काळे मार्गावर जाण्यासाठीच्या चौकात तर खड्ड्यांनी कहर केला आहे. येथून पुढे कमानी सिग्नलवरही खड्ड्यांनी बस्तान बांधले असून, लाल बहादूर शास्त्री मार्गाहून विद्याविहारकडील मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. बैलबाजार येथील रस्ता नुकताच बनविण्यात आल्याने या रस्त्यावर खड्डे दिसत नाहीत.
साकीनाका ते कमानी मार्गावरही रस्त्यालगत खड्डे पडले आहेत. काळे मार्गावर काजुपाड्याकडे जाणाऱ्या चौकात तर भलेमोठे खड्डे आहेत. कुर्ला स्थानकाकडे जात असलेला न्यू मिल रोडही नुकताच बनविण्यात आल्याने येथे फारसे खड्डे नाहीत. मात्र जेथे खड्डे पडले आहेत; ते बुजविण्यासाठी महापालिकेकडे मटेरियल नाही, अशी अवस्था आहे. एकंदर लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला स्थानकाकडे जाणारा न्यू मिल रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडलगतचा रस्ता, साकीनाका आणि कमानीला जोडणारा काळे मार्ग, विद्याविहार स्थानकाकडे जाणारा रस्ता अशा प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
एल वॉर्डमधील अंतर्गत रस्त्यांचा विचार केल्यास ज्या रस्त्यांची कामे नुकतीच झाली आहेत; अशा रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, उर्वरित रस्त्यांवर अंतराअंतरावर खड्डे पडल्याने संपूर्ण कुर्लाच खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, येथील प्रत्येक रस्त्यालगतचा विशेषत: मोठ्या रस्त्यालगतचा भाग हा पेव्हर ब्लॉकने भरण्यात आला आहे. हा भाग भरताना पेव्हर ब्लॉक आणि रस्ता संमातर येणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र रस्ता आणि पेव्हर ब्लॉकने भरलेला भाग यामध्ये समतोल नाही. परिणामी, मुख्य रस्ता वर आणि पेव्हर ब्लॉकने भरलेला भाग खाली, अशी येथील अनेक रस्त्यांची अवस्था आहे. अशा रस्त्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. येथील खड्डे लवकरात लवकर भरले जावेत, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनीही केली आहे.
>क्वालिटी कंट्रोल पाळत नाहीत
मुंबई महापालिका आयुक्तांनी ४८ तासांत मुंबईतील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानुसार, एल वॉर्डमधील सर्व खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे बुजविण्यात आलेले सर्व खड्डे उखडले आहेत. मुंबई महापालिका खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स वापरत आहे. मात्र माझे म्हणणे असे आहे की, कोल्डमिक्स तंत्रज्ञान व्यवस्थित नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये क्वालिटी कंट्रोल महत्त्वाचा असतो; नेमका तो येथे नाही. खड्डे बुजविण्यासाठी असे तंत्रज्ञान वापरून अथवा अशा पद्धती वापरून पालिका मुंबईकरांचा पैसा खड्ड्यात घालत आहे. येथील खड्ड्यांबाबतचे फोटो आयुक्तांना यापूर्वीच दाखविले आहेत. आता तरी त्यांनी वेळीच पावले उचलत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. दुसरे असे की, जेव्हा रस्ता बनविला जातो; तेव्हाच तो असा बनवा की त्यावर खड्डे पडणार नाहीत. मात्र, नेमका येथे गोंधळ होतो आणि मुंबईकरांना खड्ड्यांना सामोरे जावे लागते.
- डॉ. सईदा खान, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस
>एल वॉर्डमधील खड्डयांना मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार आहे. क्वालिटीकडे लक्ष दिले असते तर खड्डे पडल्याची वेळ आलीच नसते. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही. अधिकारी हा विषय गांर्भीयाने घेत नाहीत. हा पैसा लोकांचा आहे. लोकांचा पैसा कराच्या रुपातून जर प्रशासनाकडे जमा होतो तर पालिका काम का करत नाही; हा सवाल आहे.
- संजय तुर्डे,
नगरसेवक, मनसे
>एल वॉर्डमध्ये पडलेल्या खड्ड्यांची छायाचित्रे काढून साहाय्यक आयुक्तांना दाखविली होती. सभागृहातही आवाज उठविला होता. खड्ड्यांच्या तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने उत्तर दिले की, खड्डे बुजविण्यासाठी मटेरियल नाही. एवढा निष्काळजीपणा प्रशासनाने करणे योग्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एल वॉर्डमधील खड्डे बुजविण्यासाठी डेब्रिज वापरण्यात आले. खड्ड्यांत टाकण्यात आलेले डेब्रिज पावसाच्या पाण्यात वाहून गेले. यावर प्रशासनाने ठोस उपाय शोधून काढला पाहिजे.
- दिलीप लांडे,
नगरसेवक, शिवसेना
>महापालिका ज्या कंत्राटदाराला रस्त्याचे काम देते; किंवा ज्या कोणाला खड्डे बुजविण्याचे काम दिले जाते, त्याने ते काम व्यवस्थित करण्याची गरज आहे. खड्डे बुजविण्यासाठी उत्तम दर्जाचे साहित्य वापरले अथवा रस्ता बनवितानाच व्यवस्थित बनविला तर भविष्यात अडचणी येत नाहीत. मात्र आपल्याकडे या घटकांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे खड्डे प्रकरणात आपण जेवढी टीका महापालिका प्रशासनावर करतो; त्यापेक्षा अधिक जाब खरे तर कंत्राटदाराला विचारला पाहिजे.
- राकेश पाटील, माजी सचिव, कालिना विधानसभा, भाजपा