मुंबई : कुर्ला नेहरुनगर परिसरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मुंबई महापालिकेने चार महिन्यांपूर्वी ओपन जिम तयार केली होती. सध्या या ओपन जिमची दुरवस्था झाली असून, काही सामान तुटलेल्या अवस्थेत आहे, तर काही सामान चोरीला गेल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. कुर्ला नेहरुनगर परिसरातील डॉ. आंबेडकर उद्यानाची पूर्वी दुरावस्था होती. रहिवाशांच्या मागणीनंतर पालिकेने काही महिन्यांपूर्वीच डागडुजी केली. तसेच बागेच्या बाजूलाच असलेल्या छोट्याशा मैदानात तरुणांसाठी ओपन जिम तयार केली. रात्रीच्या वेळेस या उद्यानात लाइट नसल्याने, याचाच फायदा घेत काही गर्दुल्ले या उद्यानात नशा करण्यासाठी बसत आहेत. याच दरम्यान, नशेच्या धुंदीत या गर्दुल्ल्यांनी येथील लहान मुलांच्या खेळण्यांची आणि ओपन जीमची म्ोठी तोडफोड केली आहे. काही ठिकाणी तर गर्दुल्ल्यांनी ही खेळणी तोडून ती चोरी केली आहेत. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवसांत आम्ही मुलांनी खेळायचे कुठे, असा सवाल बच्चे कंपनीकडून विचारला जात आहे. पालिकेने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी हायमस्ट लाइट लावली आहे. मात्र, ही लाइट वारंवार बंद पडत असल्याने, गर्दुल्ल्यांना ही संधी मिळते. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप रहिवाशांनी केला, तसेच या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकालादेखील गर्दुल्ल्यांकडून कधी-कधी मारहाण केली जाते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) दरम्यान, याबाबत स्थानिक नगरसेविका संजना मुनगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, ‘गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा या ठिकाणी दुरुस्ती केली आहे. तरीही पुन्हा एकदा पालिकेकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरच ही खेळणी दुरुस्त होतील.’
कुर्ल्यात पालिका उद्यानाची दुरवस्था
By admin | Published: April 10, 2016 1:59 AM