- सचिन लुंगसे
मुंबई : कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर एसटी स्टॅण्डमध्ये एसटीऐवजी भंगार वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत़ त्यामुळे हा एसटी डेपो आहे की भंगार डेपो आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्त केलेल्या वाहनांचा भरणा येथे केला आहे़
नेहरूनगर बस स्थानकात एकूण ५०९ एसटी आहेत़ त्यापैकी दररोज ४१० एसटी गंतव्य ठिकाणी जातात आणि त्याच परत बस स्थानकात येतात. येथे एकूण ४३३ कर्मचारी कार्यरत आहेत़ बस स्थानकात १४ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच निदर्शनास येते ती भव्य अशी मोकळी जागा. या मोकळ्या जागेचे डांबरीकरण करण्यात आले आहे़ येथे बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरगावाहून येणाºया गाड्या उभ्या केल्या जातात. जेथे गाड्या उभ्या राहतात तो परिसर स्वच्छ आहे. त्यासमोर प्रवाशांसाठीची बैठक व्यवस्था आहे़ तेथेही स्वच्छता आहे. स्थानकाच्या उत्तरेकडे शौचालय आहे़ त्याचीही स्वच्छता व्यवस्थित ठेवली जात नाही़ तिकीट घराचा परिसर साफ असतो.
स्थानकाच्या मागे अधिकारी वर्गाची वसाहत आहे़ स्थानकाच्या उत्तरेकडे गॅरेज आणि कर्मचारी वर्गासाठीच्या कामकाजाची इमारत आहे. येथील सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक माहितीचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. उद्घोषणाही वेळोवेळी होत असते. प्रवाशांना आणि कर्मचाºयांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते.मात्र पूर्वेकडील गाड्या उभ्या राहत असलेल्या जागा वगळून उर्वरित परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. आरटीओने जी वाहने जप्त केली आहेत; ती वाहने येथील पूर्वेकडील कोपºयात आणून उभी करण्यात आली आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने येथे उभी असल्याने त्यावर गंज चढला आहे. यामध्ये बस, ट्रक, रिक्षा, खासगी चारचाकी वाहने; अशा कित्येक वाहनांचा समावेश आहे. मध्यंतरी येथे लागलेल्या आगीत काही भंगार वाहने जळून खाक झाली होती. त्यानंतरही प्रशासनाने काहीच खबरादारी घेतलेली नाही. परिसरात खूप डेब्रिज पडले आहे़ मेट्रो-४ च्या कामासाठी येथे काही जागा घेण्यात आली आहे़ तेथेही अस्वच्छता आहे.