केवायसी अपडेट केले, खात्यातून पाच लाख गेले; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:04 AM2024-03-01T11:04:43+5:302024-03-01T11:06:37+5:30
याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मुंबई : पायधुनीतील वृद्धेला केवायसी अपडेट करणे भलतेच महागात पडले आहे. यामध्ये अनोळखी लिंकवर माहिती भरल्याने त्यांच्या खात्यातील ४ लाख ९० हजार रुपयांवर पोलिसांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मस्जिद बंदर परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वीणा बासू यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी त्यांना अज्ञात क्रमांकावरून डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचा संदेश आला. त्यानुसार, संबंधित लिंकवर क्लिक करून त्यांनी माहिती भरली. अनोळखी लिंकवर माहिती भरताच १४ ओटीपी आले. ओटीपी ओपन केलेल्या लिंकमध्ये आलेल्या फॉर्ममध्ये भरून तो सबमिट केला. तेव्हा कोणतीही रक्कम खात्यातून वजा झाली नाही. २७ तारखेला अनोळखी क्रमांकावरून केवायसी अपडेट करण्याबाबत संदेश आला. त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने त्यांना कॉल आला. कॉलधारकाने बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसीबाबत विचारले. पुन्हा मोबाइलवर लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले. फोन चालूच ठेवून माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर काही कळण्याच्या आतच खात्यातून तब्बल ४ लाख ९० हजार रुपये गेल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.